उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण
कल्याण डोंबिवली | ११ मे :
कल्याण-डोंबिवलीसह एमएमआर आणि अंतर्गत कोकण परिसरात उष्णतेची तीव्र लाट कायम असून सलग चौथ्या दिवशी तापमानाने ४३ अंशांचा टप्पा गाठला आहे. मात्र उद्यापासून तापमान हळूहळू घसरून उष्णतेची लाट संपुष्टात येणार आहे असी दिलासा देणारी महती खाजगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली असून तापमान सामान्य आले तरी घामाच्या धारा कायम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Decade’s Most Severe Heatwave Hits Konkan; Kalyan-Dombivli Records 43°C for the Fourth Consecutive Day )
प्रचंड उकाडा, वाढलेली आर्द्रता आणि दुपारच्या कडक उन्हामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. आज कल्याणमध्ये ४३ अंश तर डोंबिवलीमध्ये ४२.९ अंश तापमानाची नोंद झाली असून अंबरनाथ, बदलापूर, नेरळ, कर्जत आणि ठाणे परिसरातही तापमान ४१ ते ४४ अंशांच्या दरम्यान पोहोचले आहे. हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांच्या मते गेल्या १० वर्षांतील ही सर्वाधिक तीव्र उष्णतेची लाट मानली जात आहे.
कोकण आणि एमएमआर परिसरात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस तीव्र होत असून सलग चौथ्या दिवशीही अंतर्गत कोकणात भीषण उष्णतेची लाट कायम राहिली आहे. रविवारी अनेक भागांमध्ये तापमानाने ४० ते ४४ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून गेल्या १३ वर्षांतील मे महिन्यातील उच्चांकी तापमानाची नोंद अनेक ठिकाणी झाल्याची माहिती अभिजित मोडक यांनी दिली.
तर शनिवारपासून सोमवारपर्यंत मुंबई महानगर प्रदेशातील मुंब्रा, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, कर्जत, नेरळ, ठाणे, मुलुंड तसेच पालघर जिल्ह्यातील अनेक भागांनी विक्रमी उष्णतेचा सामना केला. हवामान निरीक्षणांनुसार या भागांमध्ये मे महिन्यातील गेल्या दशकातील सर्वाधिक तापमान नोंदवले गेले आहे.
विशेष म्हणजे, अंतर्गत उत्तर कोकणातील अनेक भागांमध्ये सलग चार दिवस तापमान ४१ अंशांपेक्षा अधिक राहिले. या भागासाठी इतक्या सातत्याने आणि व्यापक स्वरूपात उष्णतेची लाट अनुभवणे अत्यंत दुर्मिळ मानले जात आहे.
सोमवारी सर्वाधिक तापमान सुकसळे येथे ४४.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यानंतर बिरवाडी ४४.२, कर्जत ४४.१, भातसानगर ४४, नेरळ ४३.८, अंबरनाथ ४३.२, पलावा ४३.१, कल्याण ४३ आणि डोंबिवली ४२.९ अंश तापमानाची नोंद झाली. ठाणे ४१.१, पनवेल ४१.२, ऐरोली ४१.३, खारघर ४१.५ तर मुंब्रा ४१.८ अंशांवर पोहोचले.
किनारपट्टी भागातही उष्णतेची तीव्रता वाढल्याचे दिसून आले. पालघरमध्ये ४०.१ अंश तापमानाची नोंद झाली, तर विरार ३९.१, अलीबाग ३८.२, डहाणू ३७.९ आणि मुंबई एससीझेडमध्ये ३५.८ अंश तापमान राहिल्याचे हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी एलएनएनशी बोलताना सांगितले.

