Site icon LNN

कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी ते भवानी चौक परिसराचे डीप क्लिनिंग ; महापौर ॲड हर्षाली थविल- चौधरी यांच्याकडून आढावा

अनधिकृत फेरीवाले आणि फुटपाथवरील अतिक्रमणधारकांना सक्त ताकीद; स्वच्छता व अतिक्रमणमुक्त शहरासाठी महापौर आक्रमक

कल्याण | २ नोव्हेंबर
स्वच्छ, सुंदर आणि अतिक्रमणमुक्त कल्याण-डोंबिवली शहराच्या दिशेने महापालिका प्रशासनाने विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी (२ नोव्हेंबर) कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौक ते भवानी चौक (प्रेम ऑटो) परिसरात स्वच्छता स्पेशल ड्राईव्ह राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान महापौर ॲड. हर्षाली विजय चौधरी-थविल यांनी परिसराची पाहणी करून स्वच्छता कामांचा आढावा घेतला. (Deep Cleaning Drive from Durgadi to Bhavani Chowk in Kalyan West; Mayor Adv. Harshali Thawil-Chaudhary Reviews the Initiative)

या विशेष मोहिमेअंतर्गत संबंधित परिसरात डीप क्लिनिंग करून रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर रस्त्यांवरील अनधिकृत फेरीवाले तसेच फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना स्पष्ट ताकीद देण्यात आली असून, सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

फुटपाथ हे नागरिकांना सुरक्षितपणे चालण्यासाठी आहेत, अतिक्रमण करण्यासाठी नाहीत. त्यामुळे सार्वजनिक रस्ते, पदपथ आणि परिसर स्वच्छ व अतिक्रमणमुक्त ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी ठाम भूमिका महापौर ॲड हर्षाली थविल- चौधरी यांनी मांडली.

या पाहणी दौऱ्यावेळी उपायुक्त रामदास कोकरे, सहाय्यक आयुक्त सावंत, अतिक्रमण विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच सफाई विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. स्वच्छता ही केवळ एखाद्या दिवसापुरती किंवा मोहिमेपुरती मर्यादित न राहता ती शहराची कायमस्वरूपी ओळख बनली पाहिजे. यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन महापौर ॲड. हर्षाली विजय चौधरी-थविल यांनी यावेळी केले.

‘एकच ध्यास… स्वच्छ, सुंदर आणि अतिक्रमणमुक्त कल्याण-डोंबिवली!’ या संकल्पनेतून शहरातील स्वच्छता आणि सार्वजनिक जागांच्या व्यवस्थापनावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे.

Exit mobile version