Home क्राइम वॉच खडकपाडा येथील शासकीय कार्यालयांच्या आवारात रिक्षेत सापडले डिटोनेटर आणि जिलेटिनच्या कांड्या

खडकपाडा येथील शासकीय कार्यालयांच्या आवारात रिक्षेत सापडले डिटोनेटर आणि जिलेटिनच्या कांड्या

कल्याण दि.28 सप्टेंबर :
कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरातील डीसीपी (पोलीस उपायुक्त) आणि प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात उभ्या असणाऱ्या रिक्षेत जिलेटिनच्या कांड्या आणि डिटोनेटर सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र रिक्षाचालक आणि महिलांना फसवण्यासाठी हा कट रचला असावा असा प्राथमिक अंदाज खडकपाडा पोलिसांनी व्यक्त केला आहे.

खडकपाडा परिसरात कल्याण पोलीस उपायुक्त कार्यालय, निवडणूक कार्यालय आणि प्रांताधिकरी कार्यालय हे एकाच इमारतीमध्ये आहेत. त्याच्या तळ मजल्यावर डीसीपी कार्यालय, पहिल्या मजल्यावर निवडणूक कार्यालय आणि दुसऱ्या मजल्यावर प्रांताधिकरी कार्यालय आहे. या कार्यालयात आज दुपारी साडेचारच्या सुमारास या प्रांताधिकारी कार्यालयात एका रिक्षेतून तीन महिला आल्या होत्या. अंबरनाथ तालुक्यातील वसाद गावातून प्रांताधिकारी आपल्या जमिनीच्या कामानिमित्त या महिला आल्या होत्या. या कार्यालयात प्रवेश करताना प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला ही रिक्षा उभी करण्यात आली होती.

दरम्यान तळ मजल्यावरील डीसीपी कार्यालयात एक चिठ्ठी मिळाली. ज्यामध्ये ‘या इमारतीच्या कार्यालयाच्या आवारात उभ्या असणाऱ्या रिक्षेत स्फोटकं ठेवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. त्याची तातडीने दखल घेत पोलिसांनी रिक्षेचा शोध सुरू केला असता कार्यालयाच्या आवारात संबंधित रिक्षा आढळून आली. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकासह श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. या रिक्षेची तपासणी केली असता एका डब्यामध्ये जिलेटिनच्या 2 कांड्या आणि 4 डिटोनेटर आढळून आले. खडकपाडा पोलिसांनी हे सर्व खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच रिक्षाचालक आणि संबंधित महिलांनाही खडकपाडा पोलिसांनी चौकशीसाठी आपल्या ताब्यात घेतले आहे.

दरम्यान या सर्व प्रकरणाचा कसून तपास केला जात असल्याचे खडकपाडा पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*