Home ठळक बातम्या त्यांचीच आज सत्तेसाठी सावरकरांवर लांच्छन लावणाऱ्यांच्या मांडीला मांडी – देवेंद्र फडणवीस यांची...

त्यांचीच आज सत्तेसाठी सावरकरांवर लांच्छन लावणाऱ्यांच्या मांडीला मांडी – देवेंद्र फडणवीस यांची शिवसेनेवर टिका

डोंबिवली दि.3 डिसेंबर :
काल परवापर्यंत जे स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठी भारतरत्नची मागणी करत होते. तेच आज सत्तेसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लांच्छन लावणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत अशी कडवट टिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली. डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात झालेल्या ख्यातनाम व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते.

कालपर्यंत सावरकरांचा ज्यांना जाज्वल्य अभिमान होता आणि त्यांना भारतरत्न देण्याची मागणी करायचे. आज त्यांची अवस्था अशी आहे की ते ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत ते रोज सावरकरांवर लांच्छन लावत आहेत. आणि यांचे तोंडावर बोट आहे, चिडीचूप आहेत कारण त्यांना सरकार चालवायचे आहे असा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. तर संसदेच्या अधिवेशनात निलंबितन झालेल्या शिवसेनेच्या खासदारांनी माफी मागण्यासाठी आम्ही सावरकर आहोत का? असा सवाल विचारल्याचे फडणवीस यांनी सांगत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नखांचीदेखील सर नसल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच सावरकर होण्यासाठी तप करावे लागतो, त्याग करावा लागतो, तेजस्वी व्हावे लागते, अंदमान कारागृहात मोठ्या प्रमाणात 11 वर्षे अत्याचार सहन करूनही भारतमाता की जय म्हणणाऱ्या सावरकरांवर ते लांच्छन लावत आहेत. हे सत्तेकरता मिंधे झाल्याची टिकाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शिवसेनेवर केली.

तर त्रिपुरामध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार होतो आहेत असे सांगून या पद्धतीने दंगली घडवून त्याचे बीज संपूर्ण देशात पेरायचे काम राहुल गांधी सारखे नेते करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. गरीब, वनवासी , वंचित यांची डोकी भडकवून त्यांना दंगली करण्यास भाग पाडले. मात्र पोलिसांनी त्यांचा बुरखा टराटरा फडला असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

तर सच्चीदानंद शेवडे यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की डावे आणि उजवे असा कोणताही भेद नाही. मात्र डाव्यानीच आम्ही उजवे असल्याचे जाहीर केले आहे. सावरकरांच्या राष्ट्रभक्तीने आम्ही प्रेरित झालो असून समाजमाध्यमातून व्यक्त होणारी तरुण पिढी फार हुशार आणि वाचन करून लिहिते.” बाप दाखवा नाही तर श्राद्ध करा” अशा विचारांची ही पिढी असल्याने त्यांचे कौतुक वाटत असल्याचे डॉ. शेवडे म्हणाले.

दरम्यान या सोहळ्यात डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी लिहिलेल्या डावी विषवल्ली या 50 व्या पुस्तकाचे प्रकाशनही देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, प्रवचनकार सु. ग. शेवडे, टिळक विद्यामंदिर प्रसारक संस्थेचे श्रीकांत पावगी, पै फ्रेंड्स लायब्ररीचे पुंडलिक पै यांच्यासह अनेक।मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा