यंदा संस्थेच्या 3 ऐतिहासिक टप्प्यांचा होतोय त्रिवेणी संगम
कल्याण दि.8 डिसेंबर :
शास्त्रीय संगीताच्या प्रचार आणि प्रसाराच्या अविरत सेवेसाठी राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केलेल्या कल्याण गायन समाजाच्या देवगंधर्व महोत्सवाला ऐतिहासिक टप्प्यांच्या त्रिवेणी संगमाची सुवर्ण किनार लाभली आहे. येत्या 12 ते 14 डिसेंबर दरम्यान कल्याणातील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात होणाऱ्या या महोत्सवात संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकार सहभागी होणार असल्याची माहिती संस्थेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. कल्याण गायन समाज आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विशेष सहकार्याने हा देवगंधर्व महोत्सव होत आहे. या पत्रकार परिषदेला केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल, शताब्दी समितीचे ॲड. शैलेंद्र जल्लावार, गायन समाज संस्थेचे राम जोशी, प्रशांत दांडेकर, महेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. (Devgandharva Mahotsav: A Golden Musical Extravaganza in the Centenary Year of Kalyan Gayan Samaj)
आपल्या स्थापनेचे शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या कल्याण गायन समाजाच्या माध्यमातून गेल्या 23 वर्षांपासून या देवगंधर्व महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. कल्याण गायन समाजाच्या शताब्दी वर्षामध्ये होणारा यंदाचा देवगंधर्व महोत्सव विशेष उत्साहात साजरा होत आहे. १२ ते १४ डिसेंबर या कालावधीत अत्रे रंगमंदिर येथे होणारा या महोत्सवाचा २४वा वर्ष म्हणजेच रौप्यमहोत्सवी टप्पा असून संगीतप्रेमींसाठी ही एक अद्वितीय सांगीतिक मेजवानी ठरणार आहे. तर संगीताचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या महोत्सवाच्या प्रवेशिका सवलतीच्या दरात देण्यात येणार असल्याचेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
संस्थेच्या ऐतिहासिक टप्प्यांचा त्रिवेणी संगम…
सन २०२५-२६ हे वर्ष कल्याण गायन समाजासाठी तीन मोठ्या ऐतिहासिक टप्प्यांचा त्रिवेणी संगम ठरणार आहे.
* संस्थेचे शताब्दी वर्ष
* दिनकर संगीत विद्यालयाचे सहस्रचंद्रदर्शनी वर्ष
* देवगंधर्व महोत्सवाचे रौप्यमहोत्सवी वर्ष
शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानामुळे कल्याण शहराची सांस्कृतिक ओळख देशभर पसरली आहे. गेल्या १०० वर्षांत कल्याण गायन समाजाच्या माध्यमातून १ हजार ७०० हून अधिक कलाकारांनी संस्थेच्या व्यासपीठावर कलाविष्कार सादर केले आहेत. तर १२ हजारांपेक्षा आदी विद्यार्थ्यांनी या संस्थेमध्ये संगीताचे प्रशिक्षण घेतले आहे.
दिग्गज कलाकारांची उपस्थिती : रसिकांसाठी पर्वणी
या वर्षीच्या देवगंधर्व महोत्सवात दिग्गज कलाकारांचे सादरीकरण होणार आहे. ज्यामध्ये
* पं. व्यंकटेश कुमार
* उस्ताद शाहिद परवेझ
* पं. राकेश चौरसिया
* डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे
तसचे तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या संकल्पनेतील ‘तालयात्रा’ कार्यक्रमासह स्थानिक कलाकारांनी बसवलेले ‘संगीत ययाती–देवयानी’ हे नाटकही महोत्सवाची शोभा वाढवणार आहे.
या महोत्सवाच्या प्रवेशिका अत्रे रंगमंदिर येथे तसेच BookMyShowवर ऑनलाईन उपलब्ध आहेत.
शताब्दी समितीचे नेतृत्व
देवगंधर्व महोत्सव आणि शताब्दी वर्षाचे नेतृत्व प्रतिष्ठित व्यक्तींकडे सोपविण्यात आले आहे :
* अध्यक्ष : सीताराम कुंटे (माजी मुख्य सचिव, महाराष्ट्र)
* उपाध्यक्ष : माधव जोशी (टाटा समूह)
* डॉ. नंजप्पा (कल्याण)
* संस्थेचे अध्यक्ष : डॉ. संदीप जाधव.
कल्याण गायन समाजाचे दिनकर संगीत विद्यालय : ४५० विद्यार्थ्यांसह सक्रिय
* शास्त्रीय गायन
* तबला
* हार्मोनियम
* बासरी
* कथक
* भरतनाट्यम
तसेच चित्रकला, रांगोळी अशा कलांचे या संस्थेत प्रशिक्षण दिले जाते.
नवीन कलासंकुल आणि रेकॉर्डिंग स्टुडिओसाठी प्रयत्न…
कल्याणातील खडकपाडा आणि वाढत्या नविन भागासाठी अत्याधुनिक कलासंकुल उभारण्याचा संस्थेचा मानस आहे. कल्याणात आधुनिक रेकॉर्डिंग स्टुडिओ सुरू करण्याचाही प्रयत्न केला जाणार असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. कल्याण गायन समाज ही नोंदणीकृत चॅरिटेबल ट्रस्ट असून नुकतीच CSR नोंदणीही प्राप्त झाली आहे.
शताब्दी वर्षात अनेक उपक्रम प्रस्तावित…
* सांगीतिक व्याख्याने, प्रात्यक्षिके
* शास्त्रीय गायन स्पर्धा
* तबला वादन स्पर्धा
शास्त्रीय संगीताचा गोडवा सर्वदूर पोहोचविणे आणि सांस्कृतिक जाणीवा वृद्धिंगत करणे हे संस्थेचे प्रमुख ध्येय असून हे प्रयत्न यापुढेही अव्याहत सुरू राहणार असल्याचे संस्थेने स्पष्ट केले.

