Site icon LNN

डोंबिवलीतील डॉक्टर मारहाणप्रकरणी आयएमए आक्रमक; कायदेशीर कारवाई न झाल्यास कल्याण डोंबिवलीतील खासगी डॉक्टरांचाही बंदचा इशारा

कल्याण आय एम ए अध्यक्ष डॉ. राजेश राजू यांच्यासह आयएमए पदाधिकाऱ्यांनी घेतली आयुक्तांची भेट

कल्याण डोंबिवली | ७ जुलै :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेसना मारहाण केल्याप्रकरणी कल्याण डोंबिवलीतील इंडियन मेडीकल असोसिएशनने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. डॉक्टरला मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई न झाल्यास कल्याण डोंबिवलीतील सर्व खासगी डॉक्टर्सनीही बंद पुकारण्याचा इशारा दिला आहे. या घटनेप्रकरणी आयएमए कल्याण डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांनी आज केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेत आपली भूमिका स्पष्ट केली. (Attack on Dombivli Doctor Sparks Outrage; IMA Warns of Kalyan-Dombivli Doctors’ Strike Over Delay in Legal Action)

गरोदर महिलेच्या उपचारावरून केडीएमसीच्या डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेसना शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांकडून मारहाण झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत असून शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. याप्रकरणातील दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पवित्राही त्यांच्याकडून घेण्यात आला आहे.

तर डॉक्टर आणि नर्सेसच्या मारहाणीचा इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या कल्याण आणि डोंबिवली शाखांनीही निषेध करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. आयएमए कल्याण – डोंबिवलीनेही शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा दिला आहे. तसेच याप्रकरणी दोन्ही शाखांच्या पदाधिकाऱ्यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेत संबंधितांवर कारवाईची आग्रही मागणी केली. तसेच उद्यापर्यंत डॉक्टर आणि नर्सेसना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास कल्याण डोंबिवलीतील आयएमएशी संलग्न सर्व खासगी डॉक्टर्सही आपापल्या वैद्यकीय सेवा बंद ठेवतील असा इशाराही दिल्याची प्रतिक्रिया कल्याण आयएमएचे अध्यक्ष डॉ. राजेश राघव राजू यांनी दिली आहे.


केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांना भेटलेल्या आयएमएच्या शिष्टमंडळात कल्याणचे अध्यक्ष डॉ. राजेश राघव राजू, डोंबिवली अध्यक्षा डॉ. कामत, कल्याण आयएमएचे सचिव डॉ. हिमांशु ठक्कर, खजिनदार डॉ. स्वाती शेलार, माजी अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांच्यासह डॉ. राहुल तिवारी, डॉ. अमित धर्माधिकारी, डॉ. मनोज पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version