Site icon LNN

डोंबिवलीच्या ‘नमो रमो नवरात्रोत्सवा’त सामाजिक बांधिलकीचा जागर; दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी ५१ लाख रुपये जमा

उत्सवाचा खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात, सेलिब्रिटींनाही यंदा फाटा

डोंबिवली | १२ ऑक्टोबर
डोंबिवलीतील ‘नमो रमो नवरात्रोत्सवा’ने दुष्काळग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी उत्सवावरील खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला असून व्यापाऱ्यांच्या योगदानातून आतापर्यंत ५१ जमा झालेले लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येणार आहे. डोंबिवलीत पारंपरिक घटस्थापनेच्या मुहूर्तावर ‘नमो रमो नवरात्रोत्सवा’चा भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते देवीची पूजा-अर्चा करून नऊ दिवस चालणाऱ्या उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. (Dombivli’s Namo Ramo Navratri Raises ₹51 Lakh for Drought-Hit Communities; Social Responsibility Takes Centre Stage)

उत्सवाच्या खर्चाला कात्री; दुष्काळग्रस्तांच्या मदतीला प्राधान्य
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवरात्रोत्सव मंडळांना दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ‘नमो रमो नवरात्रोत्सवा’च्या आयोजकांनी यंदा उत्सवावरील खर्च कमी करून मदतकार्यासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी डोंबिवलीतील व्यापाऱ्यांना आर्थिक योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत आतापर्यंत ५१ लाख रुपये जमा झाले आहेत. हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येणार आहे.

भाविकांनाही मदतीचे आवाहन; अतिरिक्त निधीही मुख्यमंत्री सहायता निधीत
नवरात्रोत्सवाच्या पुढील नऊ दिवसांत देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी योगदान देण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. उत्सवादरम्यान जमा होणारी अतिरिक्त रक्कमही मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केली जाणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

विशेष म्हणजे, उत्सवावरील अनावश्यक खर्च टाळून सामाजिक कार्यासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध व्हावा, या उद्देशाने यंदा कोणत्याही सेलिब्रिटीला निमंत्रित न करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतल्याचे रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

Exit mobile version