Home ठळक बातम्या फक्त टिका न करता चांगल्याला चांगलंही बोला – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे...

फक्त टिका न करता चांगल्याला चांगलंही बोला – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मनसेला टोला

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली मनसे शहर कार्यालयाला भेट

डोंबिवली दि. २३ ऑक्टोबर :
आमचे मन मोठे असून आम्ही चांगल्याला चांगले बोलत असतो, आपणही चांगल्याला चांगले बोलले पाहिजे. आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा फक्त टिका न करता चांगलेही आपण बोलले पाहिजे असा मिश्किल टोला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मनसेला लगावला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनतर्फे डोंबिवलीतील फडके रोडवर आयोजित दिपसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी व्यासपीठावर खासदार डॉ. शिंदे यांच्यासह मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर आणि शहराध्यक्ष मनोज घरत उपस्थित होते. त्यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी मिश्किल टिप्पणी करताना हा टोला लगावला. विशेष म्हणजे त्यानंतर खासदार डॉ. शिंदे यांनी कार्यक्रम स्थळाच्या शेजारी असणाऱ्या मनसेच्या शहर कार्यालयाला भेटही दिली.

कल्याण डोंबिवलीकरांना पावसामध्ये खड्ड्यांचा खूप त्रास झाला. मात्र दिवाळी संपल्यानंतर लगेचच आम्ही रस्त्यांच्या भूमीपूजनाचे काम करणार आहोत. ३६० कोटींचे रस्ते मंजूर झाले असून त्याचे काम याठिकाणी सुरू होणार असल्याची माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी दिली. डोबिवलीमध्ये इतका मोठा निधी पहिल्यांदाच मिळाला आहे. डोंबिवलीत अनेक प्रकल्प आपण करत आहोत, डोंबिवली माणकोली पुलाचे काम पुढच्या सहा महिन्यांत पूर्ण होईल. ज्यामुळे ठाण्याला जाण्यासाठी नविन पर्याय मिळणार असल्याचेही खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.

कल्याण डोंबिवली परिसरात चांगल्या पायाभूत सुविधा उभ्या राहण्यासाठी आपण काम करत आहोत. कल्याण रिंग रोडचे दुर्गाडी ते टिटवाळापर्यंतचे काम 80 टक्के पूर्ण झालेले आहे, दुर्गाडी ते मोठा गाव या टप्प्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातशे कोटी रुपये मंजूर केल्याने लवकरच निविदा काढण्यात येतील, या रिंग रोडमूळे डोंबिवलीकरांना एकीकडे ठाणे आणि दुसरीकडे टिटवाळ्याला कमी वेळेत जाता येणार असून दळण वळणाच्या पर्यायी व्यवस्था आपण निर्माण करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईच्या धर्तीवर कल्याण डोंबिवलीतील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपण मागणी करणार असून शिळफाटा ते रांजणोलीपर्यंत एलिव्हेटेड रस्ता बनवला जाणार असल्याचे सांगत या पावसाळ्यात आपल्याला जो त्रास झाला तो पुढच्या पावसाळ्यात होणार नसल्याची ग्वाही दिली.

दिपसंध्या सांगितिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद…खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिपावलीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या दिपसंध्या सांगितिक कार्यक्रमाला डोंबिवलीकर रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाले. सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत आणि गायक स्वप्निल बांदोडकर यांनी सादर केलेल्या एकाहून एक सरस अशा गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

 

दरम्यान यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवली शहर मनसे कार्यालयाला भेट दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर आणि शहराध्यक्ष मनोज घरत यांनी खासदार डॉ. शिंदे यांचे स्वागत करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शहरांच्या विकासासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे मत यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा