Site icon LNN

कल्याणात जलवाहिनी फुटल्याने नामांकित शाळा सलग 3 दिवस बंद ठेवण्याची वेळ

विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होतोय परिणाम

कल्याण दि.5 डिसेंबर :
कल्याण पश्चिमेच्या बैलबाजार परिसरातील केडीएमसीची मुख्य जलवाहिनी मंगळवारी फुटल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर आधीच परिणाम झाला आहे. त्यातच आता दुसरीकडे त्यामुळे या परिसरातील नामांकित के.सी. गांधी शाळाही सलग तीन दिवस बंद ठेवावी लागल्याने हजारो विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही त्याचा परिणाम होत आहे. परिणामी वाहतूक पोलीस आणि केडीएमसी प्रशासनाकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी के.सी. गांधी शाळा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. (Due to a Major Pipeline Burst in Kalyan, a Reputed School Forced to Remain Shut for 3 Consecutive Days)

कल्याण पश्चिमेतील बैल बाजार परिसरात मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असून या कामादरम्यान शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी मंगळवारी दुपारच्या सुमारास फुटली. त्यामुळे संपूर्ण कल्याण पश्चिमेममध्ये पाणीबाणी निर्माण झाली. तर या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी बैल बाजार ते गुरुदेव हॉटेलकडे येणारा रस्ता बंद ठेवण्यात आला आहे.

हा रस्ता बंद ठेवल्यामुळे आधीच नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असतानाच दुसरीकडे या कल्याणातील सर्वात मोठ्या आणि नामांकित के. सी.गांधी शाळेलाही त्याचा फटाका बसला आहे. बैलबाजार येथे ज्याठिकाणी या मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे, त्याच मुख्य मार्गावर के.सी. गांधी शाळा असून त्यामध्ये सुमारे 3 हजार विद्यार्थी आजमितीस शिकत आहेत. हा रस्ता एका बाजूने बंद करण्यात आल्याने शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या बसेसची वाहतूकही ठप्प झाली आहे. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय पाहता गेल्या बुधवारपासून आजपर्यंत शाळा बंद ठेवण्याची वेळ शाळा प्रशासनावर आली आहे.

ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर तर मोठा परिणाम होतच आहे. त्याशिवाय सध्या परीक्षेच्या हंगामासोबत विविध सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. मात्र सलग 3 दिवस शाळा बंद ठेवावी लागल्याने या उपक्रमांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांवर परिणाम होत असल्याची माहिती शाळेच्या संचालिका स्वप्नाली रानडे यांनी दिली. तसेच विद्यार्थ्यांवर होणारे हे परिणाम पाहता संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर हा रस्ता सुरू करावा किंवा अन्य पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान यासंदर्भात केडीएसमी पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधला असता या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी पहाटे पूर्ण झाले असून आज दुपारपर्यंत त्यावरून वाहतूक सुरू केली जाईल अशी माहिती कार्यकारी अभियंता महेश डावरे यांच्याकडून देण्यात आली.

Exit mobile version