Site icon LNN

गुलाबी थंडीमुळे कल्याण डोंबिवलीचा पारा आला 15 अंशांवर; यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद

कल्याण डोंबिवली दि.17 नोव्हेंबर :
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना दुसरीकडे शहरांतील तापमानामध्ये मात्र लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत आहे. कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पडलेल्या गुलाबी थंडीमुळे इथला पारा थेट 15 अंशांवर येऊन ठेपला आहे. विशेष म्हणजे यंदाच्या मोसमातील हे सर्वात निच्चांकी तापमान असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी एलएनएनशी (LNN) बोलताना दिली आहे. (due-to-the-pleasent-cold-gulabi-thandi-the-temperature-in-kalyan-dombivli-dropped-to-15-degrees-celsius-the-lowest-temperature-recorded-this-season)

यंदाचा हिवाळा हा अधिक परिणामकारक असण्याचा अंदाज नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून वर्तवण्यात येत आहेत. मात्र मे महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाने थेट दिवाळीनंतरही आपला मुक्काम कायम ठेवला होता. अगदी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वरुणराजा न चुकता कल्याण डोंबिवलीमध्ये आपली हजेरी लावत होता. त्यामुळे थंडीच्या अंदाजाबाबत लोकांच्या मनामध्ये काहीशी साशंकता निर्माण झाली होती. परंतु गेल्या शुक्रवार – शनिवारपासून रात्रीच्या वातावरणात अचानक काहीसा बदल दिसून आला. कल्याण डोंबिवलीतील मध्यवर्ती शहरी भाग वगळता ग्रामीण भागाशी जोडून असलेल्या परिसरात गुलाबी थंडीची चाहूल काही दिवसांपूर्वीच जाणवू लागली होती.

अजून दोन दिवस राहणार अशीच स्थिती…
आणि गेल्या दोन दिवसांपासून तर कल्याण डोंबिवलीच्या ग्रामीण भागासह शहरी भागातही गुलाबी थंडीचे आगमन झालेले दिसून येत आहे. परिणामी गेल्या दोन दिवसांत कल्याण डोंबिवलीच्या किमान तापमानाच्या पाऱ्याने थेट 15 अंशांपर्यंत कोलांट उडी मारल्याचे दिसून येत आहे.

साधारणपणे 15 नोव्हेंबरनंतर आपल्याकडे थंडीची चाहूल जाणवते. एकीकडे ईशान्येकडील कोरडी हवा, त्यामुळे कमी झालेली आर्द्रता आणि स्वच्छ सूर्यप्रकाशीत हवा असल्याने रात्रीतून आपल्याकडे ही तापमानाची घट जाणवत असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी एलएनएनशी बोलताना दिली. तसेच अजून दोन दिवस अशी स्थिती राहील असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. २१ नोव्हेंबरनंतर वारा दिशा बदलून आग्नेय दिशेकडून येईल आणि येताना दक्षिण भारतातून बाष्पयुक्त हवा घेऊन येण्याची शक्यता असून त्यामुळे ढगाळ हवामान होऊन तापमानात पुन्हा वाढ होण्याचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.

17 नोव्हेंबर 2025 रोजी नोंदवण्यात आलेले तापमान

कल्याण – १५.३°C
डोंबिवली – १६°C
महाबळेश्वर – ११°C
अंबोली – ११.७°C
बदलापूर – १२.९°C
आवळेगाव – १३°C
कर्जत – १३.१°C
लोणावळा – १३.२°C
सावर्डे – १३.७°C
दापोली आणि नागोठणे – १३.९°C
माणोर – १४°C
कुडाळ – १४.५°C
वेंगुर्ला – १५°C
पनवेल – १५.३°C
माथेरान – १६°C
विरार आणि उत्तन – १६.२°C
नवी मुंबई – १६.५°C
ठाणे – १६.७°C
डहाणू – १६.५°C
रत्नागिरी – १८.१°C
मुंबई (SCZ) – १८.९°C

Exit mobile version