Home ठळक बातम्या डम्पिंगवर कचरा वेचणारी मुलं कंदिल, पणत्या बनवण्यात मग्न

डम्पिंगवर कचरा वेचणारी मुलं कंदिल, पणत्या बनवण्यात मग्न

कल्याण दि.31 ऑक्टोबर :
एरव्ही कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडवर कचरा गोळा करणाऱ्या मुलांचे हात सध्या एका वेगळ्या आणि चांगल्याच कामात व्यस्त आहेत. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या सणासाठी कंदिल आणि पणत्या बनवण्यात ही मुलं गुंग झाली आहेत.

दिवाळी. दिव्यांचा आणि मुख्य म्हणजे प्रकाशाचा सण. अंधारातून उजेडाकडे जाण्याचे सामर्थ्य देणारा…आणि त्याच जोडीला कितीही अंधकार पसरला तरी मनातील ज्योत सदैव तेवत ठेवण्याची प्रेरणा देणारा उत्सव. मग अशा दिपोत्सवात आपल्या स्वयंप्रेरणेने प्रतिकूल परिस्थितीवर मात करणारे अनुबंध संस्थेचे हे ज्ञानदीप तरी कसे मागे राहतील? गेल्या 5 वर्षांपासून आपली शाळा, शाळेचा अभ्यास आणि आई वडिलांना डम्पिंगवर मदत करून उरलेल्या वेळेत आकाश कंदिल आणि पणत्या बनवण्याचा उपक्रम उत्साहात सुरू आहे.

वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 5 वर्षांपासून या मुलांकडून इकोफ्रेंडली आकाश कंदिलांची निर्मिती केली जात आहे. बांबूची चटई, सुतळ आदी साहित्य वापरून हे कंदिल बनवण्यात येत आहेत. तर त्याच जोडीला मातीच्या पणत्यांनाही अत्यंत सुबक अशा रंगसंगतीने या मुलांनी रंग भरले आहेत. आकाश कंदील आणि पणत्यांच्या विक्रीतून येणारे उत्पन्न याच मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केले जाणार आहे. या मुलांमध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील कल्पकतेला, सर्जनशीलतेला नवा आयाम मिळावा या उद्देशाने हा उपक्रम राबवत असल्याची माहीती अनुबंध संस्थेच्या सूर्यकांत कोळी यांनी दिली.

आपल्या जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी सतत झगडणाऱ्या या मुलांनी बनवलेले हे आकाश कंदिल आणि पणत्यानी इतरांच्या घरातील अंधार दूर होईल हे निश्चित. तसेच सध्या काहीसे लुकलूकणारे हे ज्ञानदीप भविष्यात आपल्या कर्तृत्वाच्या तेजाने लख्ख तळपतील आणि समाजातील अंधकार दूर करतील. असे बोलल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*