Home Uncategorised बीएसयुपीची घरं उपलब्ध करून देण्यासाठी डम्पिंग ग्राऊंडवरील मुलांची गांधींगिरी; पालिका आयुक्तांना दिली...

बीएसयुपीची घरं उपलब्ध करून देण्यासाठी डम्पिंग ग्राऊंडवरील मुलांची गांधींगिरी; पालिका आयुक्तांना दिली गुलाबाची फुलं

कल्याण दि.11 फेब्रुवारी :
बीएसयूपीची घरं मिळण्याच्या मागणीसाठी कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडवरील मुलांनी गांधीगिरी केलेली पाहायला मिळाली. महापालिका आयुक्तांना गुलाबाची फुलं भेट देत ही घरं लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी या मुलांनी केली.

केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या बीएसयूपी प्रकल्पामध्ये डम्पिंग ग्राऊंडच्या साठेनगर परिसरातील नागरिकांना घरं मंजूर झाली आहेत. या प्रकल्पांतर्गत उंबर्डे येथे ही घरं बांधण्यात आली असून त्यासाठी लोकांनी पैसेही जमा केले आहेत. मात्र त्याला आता 2 वर्षे उलटूनही अद्याप या घरांचा ताबा संबंधित रहिवाशांना मिळाला नाही. त्यामूळे या परिसरात राहणाऱ्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कचऱ्याचा वाढता डोलारा, अस्वच्छ स्वछतागृह, पावसाळ्यात वस्तीत शिरणारे गुडघाभर पाणी आदी समस्यांना इथल्या रहिवाशांना तोंड द्यावे लागत आहे.
त्यामुळे राहुल साबळे(15वी), प्रिती ढगे (11वी), शीला घुले, राजू घुले (10वी), पायल वाघमारे (9वी) प्रथमेश ढगे, अंकुश घुले आदी विद्यार्थ्यांनी आज महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. तसेच निवेदन देण्यापूर्वी पालिका आयुक्तांना गुलाब पुष्प भेट देत घरांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी साकडे घातले.

दरम्यान महापालिकेने ज्याठिकाणी या लोकांना घरं मंजूर केली असतील त्याठिकाणी यांना निश्चितच घरं उपलब्ध करून दिली जातील. त्यासाठी आवश्यक ती कामे पूर्ण करून येत्या 8 दिवसांत हा प्रश्न सोडवू असे आश्वासन महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दिले आहे. त्यामुळे गेल्या 2 वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न आता 8 दिवसात तरी सुटतो की नाही हे लवकरच स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*