Home ठळक बातम्या दुर्गाडी किल्ल्यावरील नवरात्रौत्सवावरून कल्याणात एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट आमने...

दुर्गाडी किल्ल्यावरील नवरात्रौत्सवावरून कल्याणात एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट आमने सामने

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

कल्याण दि.21 सप्टेंबर :
एकीकडे दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थच्या परवानगीवरून रस्सीखेच सुरू असताना आता कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरील नवरात्रौत्सवावरून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून गेल्या 5 दशकांहून अधिक काळापासून साजऱ्या होणाऱ्या या दुर्गाडी किल्ल्यावरील नवरात्रौत्सवाच्या परवानगीवरून हे दोन्ही गट आमने सामने आले आहेत. त्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी या पूजेची कोणाला परवानगी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आधीच गेल्या काही दिवसांपासून शिवतीर्थावर दसरा मेळाव्याच्या परवानगीवरून रणकंदन सुरू झाले आहे. त्यातच आता अवघ्या काही दिवसांवर आलेल्या नवरात्रौत्सवाच्या किल्ले दुर्गाडीवरील पुजेचा मुद्दा समोर आला आहे. दुर्गाडी किल्ल्यावरील पुजेचा हा इतिहास जाणून घेतल्यास साधारणपणे साठच्या दशकात म्हणजेच
1968 कल्याण शहर शिवसेनेकडून हा उत्सव साजरा करण्याची प्रथा पडली आहे. त्यावेळी किल्ले दुर्गाडीवर असणारा बंदीहूकूम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सपत्नीक मोडत देवीची पूजा केली होती. तेव्हापासून आजपर्यंत तब्बल ५४ वर्षे म्हणजेच पाच दशकांहून अधिक काळापासून दुर्गाडी देवीचा नवरात्रौत्सव साजरा होतोय. शिवसेनेचे शहर प्रमूख हेच किल्ले दुर्गाडी नवरात्रौत्सवाचे अध्यक्षपद भूषवतात हा तेव्हापासूनचा नेम आहे.

 

परंतू दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपामुळे यंदा काहीसे वेगळे चित्र आहे. शिवसेनेत उभी फूट पडली असून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचा गट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दुर्गाडी किल्ल्यावरील पुजेचा मान मिळण्यासाठी दोन्ही गटांनी प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. एकनाथ शिंदे गटाकडून आमदार विश्वनाथ भोईर यांनी तर उध्दव ठाकरे गटाकडून शहरप्रमुख सचिन बासरे यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यावर आता जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे दोन्ही गटांचे लक्ष लागले आहे.

इतके दिवसांपासून कोर्ट – कचेऱ्या आणि राजकारणाच्या दरबारात सुरू असणारा हा वाद आता थेट देवीच्या गाभाऱ्यापर्यंत येऊन ठेपला आहे. मात्र देवाच्या गाभाऱ्यात सर्व गट – तट, लहान – मोठा असे कोणतेही भेदभाव नसतात हा महत्वाचा मुद्दाही राजकारण्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे.

 

आम्ही गेल्या महिन्यातच परवानगीसाठी अर्ज केला आहे – सचिन बासरे, शहरप्रमुख

दुर्गाडी किल्ल्यावरील नवरात्रौत्सव साजरा करण्यासाठी आम्ही गेल्या महिन्यातच परवानगीसाठी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या उत्सवाला सुरुवात केली असून कल्याणकरांसह लाखो भक्तांच्या मनामध्ये या उत्सवाचे मानाचे स्थान आहे. त्यासाठी आम्ही उत्सवाला परवानगी मागितली असून आम्हाला ही परवानगी असा विश्वास आहे.

 

आम्हीही हा उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी मागितली आहे – विश्वनाथ भोईर, आमदार

किल्ले दुर्गाडीवरील नवरात्रौत्सव हा केवळ एका भागाचा नव्हे तर गावकीचा उत्सव म्हणून इतक्या वर्षांपासून शिवसेनेच्या माध्यमातून साजरा होत आहे. दरवर्षी केवळ कल्याणच नव्हे तर आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लाखो भाविक या नऊ दिवसांत इकडे दर्शनासाठी येतात. गेल्या 7 वर्षांपासून आपणच हा उत्सव आयोजित करत असून यंदाही आम्ही तो साजरा करण्यासाठी परवानगी मागितली आहे. आणि आम्हाला ती परवानगी नक्कीच मिळेल असा विश्वासही आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा