महापौर पदी ॲड. हर्षाली थविल – चौधरी तर उपमहापौर पदी राहुल दामले यांची निवड
कल्याण डोंबिवली दि.3 फेब्रुवारी :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील 1983 नंतरची सर्वात मोठी राजवट आता संपली. कल्याण डोंबिवलीला तब्बल 6 वर्षांनंतर महापौर आणि उपमहापौर मिळाले असून आज झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये या पदांसाठी निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. महापौर पदी शिवसेनेच्या ॲड. हर्षाली थविल – चौधरी यांची तर उपमहापौर पदी राहुल दामले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. (End of Administrative Rule: Kalyan–Dombivli Gets Mayor and Deputy Mayor After 6 Years)
कल्याण डोंबिवलीच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रत्येकी एक एकच अर्ज आल्याने तसे पाहता आजची ही निवडणूक म्हणजे निव्वळ औपचारिकता होती. मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आँचल गोयल या पिठासन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया संपन्न झाली.
महापौर – उपमहापौर पदाची निवड आणि प्रशासकीय राजवट संपली…
विशेष म्हणजे 1983 नंतरची सर्वात मोठी असणारी प्रशासकीय राजवटही आता अवघ्या काही तासांत संपुष्टात आली आहे. 1983 मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर लागू झालेली प्रशासकीय राजवट तब्बल 1995 पर्यंत म्हणजेच तब्बल 12 वर्षे होती. त्यानंतर कोविडमुळे 2020 मध्ये कार्यकाळ संपल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवट लागू झाली होती. मात्र आता कल्याण डोंबिवलीच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवड झाल्याने गेल्या 6 वर्षांपासून असलेली ही प्रशासकीय राजवटही संपुष्टात आली आहे.
क्रिकेटची टीम झाली कबड्डीची – शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक सचिन पोटे यांचा शिवसेना उबाठाला टोला
दरम्यान या महापौर आणि उपमहापौर पद निवडीच्या विशेष सभेमध्येच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमधील टोलवा टोलवी दिसून आली. आपल्या हजरजबाबीपणासाठी प्रसिद्ध असणारे शिवसेनेचे नगरसेवक सचिन पोटे यांनी शिवसेना उबाठाचे गटनेते यांना जोरदार टोला लगावला. “तुम्ही निवडून आले तेव्हा क्रिकेटची टीम होती, मात्र इकडे सभागृहात येईपर्यंत ती कबड्डीची झाली” या शब्दांत सचिन पोटे यांनी शाब्दिक कोटी केलेली पाहायला मिळाली. ज्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला होता.
तर निवड प्रक्रियेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना सभागृहात श्रद्धांजलीही वाहण्यात आली.

