Site icon LNN

नागरिकांना वेठीस धरणे बंद करा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन ; डोंबिवली शहर आणि ग्रामीणच्या वीज लपंडावावर आमदार राजेश मोरे यांचा महावितरणला कडक इशारा

डोंबिवली| ७ जुलै :
डोंबिवली शहर व कल्याण ग्रामीण परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वारंवार व दीर्घकाळाच्या वीज खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. एकदा वीज गेल्यानंतर तब्बल ८ ते १० तास, तर अनेक ठिकाणी १६ तासांपर्यंत वीजपुरवठा होत नसल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाचा जाब विचारण्यासाठी आमदार राजेश गोवर्धन मोरे यांनी आज थेट महावितरणच्या कार्यालयात धडक देत कार्यकारी अभियंता जगदीश बोडगे यांच्यासोबत सविस्तर, ठाम आणि परिणामकारक चर्चा करण्यात आली. (‘End the Power Chaos or Face Shiv Sena-Style Protest’: MLA Rajesh More Warns MSEDCL Over Repeated Outages in Dombivli)

यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, संपर्कप्रमुख विवेक खामकर, माजी नगरसेवक राजन मराठे, नगरसेवक सूरज राजन मराठे, विधानसभा समन्वयक ओम लोके, विक्रांत शिंदे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार राजेश मोरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, डोंबिवली हा १०० टक्के वीजबिल वसुली करणारा परिसर म्हणून ओळखला जातो. तरीही येथील नागरिकांना तासन्‌तास अंधारात ठेवणे, वारंवार वीजपुरवठा खंडित करणे आणि कोणतेही समाधानकारक नियोजन न करणे, हा महावितरणचा अत्यंत निष्काळजीपणाचा कारभार आहे.
बैठकीत स्मार्ट मीटरच्या विषयावरही तीव्र आक्षेप नोंदविण्यात आला. अनेक ठिकाणी स्मार्ट मीटर बसविल्यानंतर पूर्वी सुमारे ₹१,००० येणारे वीजबिल ₹१०,००० पर्यंत पोहोचल्याच्या नागरिकांच्या तक्रारी निदर्शनास आणून देत, कुठेही स्मार्ट मीटर बसवू नयेत, अशी ठाम मागणी करण्यात आली.

कार्यकारी अभियंता श्री. जगदीश बोडगे यांनी चर्चेदरम्यान स्मार्ट मीटर बसविण्यात येणार नाहीत तसेच सध्या सुरू असलेला वीज लपंडाव तातडीने दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले.
तथापि, आमदार राजेश मोरे यांनी महावितरण प्रशासनाला कडक इशारा देत सांगितले की, नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार यापुढे सहन केला जाणार नाही. वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर शिवसेना स्टाईलने हजारो नागरिकांसह तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. त्या आंदोलनातून उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील.

जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. डोंबिवली – कल्याण ग्रामीणमधील प्रत्येक नागरिकाला अखंडित वीजपुरवठा मिळालाच पाहिजे, हीच आमची ठाम भूमिका असून त्यासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल, असा निर्धार आमदार राजेश मोरे यांनी व्यक्त केला.

Exit mobile version