Site icon LNN

केडीएमसी अग्निशमन दलातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

अग्निशमन सप्ताहानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

कल्याण दि.11 एप्रिल :
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) अग्निशमन दलातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला नागरिक आणि रक्तदात्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. कल्याण पश्चिमेतील फडके मैदनाजवळील अग्निशमन मुख्यालयाच्या परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला. दरवर्षी १४ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान साजऱ्या होणाऱ्या अग्निशमन सप्ताहाच्या निमित्ताने त्याचे आयोजन करण्यात आले होते. (Enthusiastic Response to Blood Donation Camp Organised by KDMC Fire Brigade)

यावेळी रक्तदान शिबिरासोबतच अग्निशमन कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि दंत चिकित्सा शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. कल्याणातील नामांकित डॉ. सोनाली चौधरी, डॉ. अक्षय चौधरी, डॉ. स्नेहल चौधरी यांच्या चौधरी स्पेशालिटी क्लिनिकच्या माध्यमातून हा आरोग्यविषयक उपक्रम पार पडला.

विशेष म्हणजे, यंदाचे रक्तदान शिबिर हे सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आले असून कल्याण आणि परिसरातील अनेक नागरिकांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. शिबिरात जमा झालेले रक्त समाजातील गरजू रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की अग्निशमन सप्ताहाचा भाग म्हणून अग्निसुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी आगामी काळात सायकल रॅली तसेच मॉल, रेल्वे स्टेशन यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी विशेष जनजागृती उपक्रमही राबविण्यात येणार आहेत.

अग्निशमन सप्ताहाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

Exit mobile version