कल्याण डोंबिवली दि.31 डिसेंबर :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचे मतदान आणि निकाल येण्यापूर्वीच भाजपमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कल्याण पूर्व आणि डोंबिवली पूर्वेतील दोन महिला उमेदवारांचा बिनविरोध विजय निश्चित मानला जात आहे. मात्र याबाबतची अधिकृत माहिती येण्यासाठी आणखी दोन दिवस वाट पहावी लागणार आहे. (Even Before Voting and Results, Two BJP Women Candidates Elected Unopposed; Victory Secured as No Opposition Nominations Filed)
कल्याण पूर्वेतील पॅनल क्रमांक 18 अ (कचोरे, नेतीवली टेकडी, गावदेवी ,नेतेवली- मेट्रोमॉल, शास्त्रीनगर,) या प्रभागातील माजी नगरसेविका रेखा राजन चौधरी आणि डोंबिवली पूर्वेतील प्रभाग क्रमांक 26 क (म्हात्रे नगर ,राजाजी पथ,रामनगर, शिव मार्केट, सावरकर रोड) प्रभागातील आसावरी केदार नवरे अशी या भाजपच्या दोघा महिला उमेदवारांची नावे आहेत. या दोन्ही पॅनलमध्ये दोघींच्या विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
मात्र अद्याप उमेदवारी अर्जांची छाननी आणि अंतिम उमेदवारी यादी जाहीर होण्याची प्रक्रिया बाकी आहे. त्यामुळे या बिनविरोध विजयाबाबत अधिकृतपणे माहिती समोर येण्यास दोन दिवस थांबावे लागणार आहे.
मात्र या बातमीमुळे कल्याण आणि डोंबिवलीतील भाजपमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून भाजपला मतदानपूर्वीच ही मोठी लॉटरी लागल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

