Home कोरोना वेळ वाढवून द्या अन्यथा आम्हीही हॉटेल्स बंद ठेऊ – कल्याणातील हॉटेल व्यावसायिकांचा...

वेळ वाढवून द्या अन्यथा आम्हीही हॉटेल्स बंद ठेऊ – कल्याणातील हॉटेल व्यावसायिकांचा इशारा

 

कल्याण दि.5 ऑगस्ट :
राज्य सरकारने कोवीडचे निर्बंध शिथिल केल्यानंतर व्यापारी आणि दुकानदारांनी आनंद व्यक्त केला असतानाच दुसरीकडे हॉटेल व्यावसायिक मात्र चांगलेच नाराज झाले आहेत. वेळ वाढवून देण्याच्या मागणीसाठी आता कल्याणातील हॉटेल व्यावसायिकांनीही हॉटेल्स बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कल्याणातील हॉटेल व्यावसायिकांनी आज एक बैठक घेतली. त्यानंतर एलएनएनशी बोलताना कल्याण हॉटेल ओनर्स असोसिएशनने ही माहिती दिली.

कोवीड रुग्णांची संख्या कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 2 दिवसांपूर्वी ठराविक जिल्ह्यातील कोवीड निर्बंध शिथिल केले. त्यामध्ये दुकाने उघडी ठेवण्याबाबतचे सर्व निर्बंध हटवत रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली. त्यामुळे गेल्या दिड वर्षांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या दुकानदार आणि व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे हॉटेल, रेस्टॉरंटचे निर्बंध तसेच कायम ठेवत दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयावर हॉटेल व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच गेल्या दिड वर्षांपासून आम्हीही सर्व जण आर्थिक संकटात सापडलो आहोत. त्यामुळे आम्हालाही दुकानदारांप्रमाणे वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे.

 

कोवीड काळात राज्य सरकार असो की कल्याण डोंबिवली महापालिका दोघांनीही खूप चांगले काम केले आहे. त्याबद्दल कोणाचेही दुमत नाहीये. मात्र गेल्या दिड वर्षांत हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दुकानदारांप्रमाणे सरकारने आमचाही विचार करावा. वेळ वाढवून न दिल्यास नाईलाजाने आम्हालाही इतर ठिकाणच्या हॉटेल व्यावसायिकांप्रमाणे हॉटेल बंद ठेवावी लागतील अशी माहिती कल्याण हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण शेट्टी यांनी दिली. कल्याणातील प्रत्येक हॉटेलबाहेर “आम्हाला न्याय द्या ,निर्बंध शिथिल करा” अशा मागणीचे फलक लावण्यात आले आहेत.
दरम्यान यावेळी झालेल्या बैठकीला कल्याण हॉटेल ओनर्स असोसिएशनचे सचिव राकेश शेट्टी, सदस्य शैलेश शेट्टी, बाळा शेट्टी, अमर घोलप, सुरेश शेट्टी यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.

मागील लेखकेडीएमसी क्षेत्रात उद्या (5 ऑगस्ट) 2 ठिकाणी लसीकरण ; कोवीशिल्डचे डोस मिळणार
पुढील लेखकल्याण – शिळ रस्त्याच्या कामाची आमदार राजू पाटील यांच्याकडून पाहणी

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा