Home ठळक बातम्या कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडवरील सामान्य कचरावेचक महिलेची ही ‘असामान्य यशोगाथा’

कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडवरील सामान्य कचरावेचक महिलेची ही ‘असामान्य यशोगाथा’

कचरा विक्रीच्या माध्यमातून अनेकांना रोजगार देत घेतली स्वतःची महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी

 

कल्याण दि.27 जनेवारी :
कल्याणची नकोशी अशी ओळख असणारे वाडेघर डम्पिंग ग्राउंड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मात्र ही चर्चा कोणत्याही नकारात्मक गोष्टीसाठी नसून यावेळी ती चर्चा होतेय या डम्पिंग ग्राउंडवरील एका सामान्य कचरावेचक महिलेच्या असामान्य यशोगाथेमूळे. हो बरोबर…वाचले तुम्ही. डम्पिंग ग्राउंडवरील कचरा वेचून या महिलेने इतरांना रोजगार उपलब्ध करून देत चक्क नवी कोरी महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी घेतली असून तिच्या या यशाचे सर्वांकडून कौतूक होत आहे. (This is an ‘extraordinary success story’ of an ordinary garbage collector at a dumping ground in Kalyan.)

डम्पिंगजवळील वस्तीमध्ये इतर कुटुंबांप्रमाणे राहणारे रेखा लाखे आणि परमेश्वर लाखे. डम्पिंगवरील कचऱ्यातून प्लॅस्टिक गोळा करायचे आणि त्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशांतून आपला उदरनिर्वाह चालवायचा. मात्र 2 वर्षांपूर्वी केडीएमसीने शून्य कचरा मोहीम राबवत वाडेघर डम्पिंग ग्राउंड बंद केले. त्यामूळे इथल्या कचरा वेचकांसमोर पोटापाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यामूळे रेखा लाखे यांनी केडीएमसी घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांची भेट घेत डम्पिंग ग्राउंड बंद झाल्याने आम्ही जगायचे कसे? असा आर्त सवाल विचारला.

त्यावर उपाय म्हणून केडीएमसी क्षेत्रातील ब आणि क प्रभागक्षेत्रात असणाऱ्या रहिवासी सोसायट्यांमधील कचरा गोळा करण्याची परवानगी प्रशासनाने काही कचरा वेचकाना दिली. आणि केडीएमसी प्रशासनाकडून मिळालेल्या याच छोट्याशा संधीचे रेखा लाखे आणि त्यांचे पती परमेश्वर लाखे यांनी अक्षरशः सोने केले. रहिवासी सोसायट्यांमधील कचरा गोळा करून आणि त्याचे वर्गीकरण करून रेखा लाखे यांनी त्याची विक्री सुरू केली. ज्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले. रेखा लाखे यांनी कचऱ्याचे व्यवस्थापन इतक्या चांगल्या पद्धतीने केले की इतर कचरवेचकांना रोजगार तर दिलाच. त्याचसोबत मिळत असणाऱ्या उत्पन्नातून कचरा गोळा करण्यासाठी चक्क एक नवी कोरी महिंद्रा बोलेरो पिकअप ही गाडीही खरेदी केली. तर कचरा विक्रीतून लाखे कुटुंबिय केडीएमसी प्रशासनाला प्रतिटन कचऱ्यामागे एक हजार रुपयांची रॉयल्टीही देत आहे.

 

एका सामान्य कचरा वेचक महिलेने आपल्या प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर असामान्य अशी उंची आज गाठत गरुडझेप घेतली आहे. इतर कचरा वेचक महिलांसह तिने समाजातील इतर व्यक्तींसाठीही ही यशोगाथा प्रेरणादायी ठरेल. यासाठी रेखा लाखेचे कौतूक करावे तेवढे थोडेच ठरणार असून तिला इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या केडीएमसी उपायुक्त रामदास कोकरे यांचे कौतूकही करणे क्रमप्राप्त ठरते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा