Home ठळक बातम्या कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडने केली आजी आणि नातीची ताटातूट

कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडने केली आजी आणि नातीची ताटातूट

केतन बेटावदकर
कल्याण दि.20 डिसेंबर :
आधीच कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडमूळे आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले असताना आता हे डम्पिंग ग्राउंड आता लोकांच्या नात्यांवरच उठल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या डम्पिंग ग्राऊंडने एका घरातील आजी आणि तिच्या लाडक्या नातीची कायमची ताटातूट करून ठेवली आहे. त्यामूळे आणखी किती जणांना आमच्यापासून हिरावून घेऊन मगच हा प्रश्न सोडवणार असा आर्त सवाल या आजीने एलएनएनशी बोलताना उपस्थित केला आहे.

मुलांसाठी आई आणि वडिलांनंतर सर्वात सुंदर कोणतं नातं असेल तर ते आजी -आजोबांचे. या नात्याचे वर्णन करायचे झाल्यास “आजी आजोबांसाठी नातवंड म्हणजे आनंदाचे क्षण काठोकाठ भरलेले असे एक जगच जणू. तर नातवंडांसाठी आजी आजोबा म्हणजे प्रेमाचा आणि मायेच्या सावलीचा अखंड वाहणारा झराच जणू. दोघांसाठीही एवढं महत्वाचे आणि हवंहवंसं हे नातं असताना कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडमुळे मात्र त्यामध्ये एक अशी दरी निर्माण केली आहे जी कधीही भरून निघणार नाही.

कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडजवळ असणाऱ्या गृहसंकुलात हे आजी आजोबा राहतात. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या घरी एका गोंडस नातीने जन्म घेतला. या तान्हुलीच्या आगमनाने आजी आजोबांच्या आनंदाला तर पारावरच राहिला नाही. मात्र त्यांचा हा आनंद अल्पायुषीच ठरला. आणि एकाच झटक्यात या डम्पिंग ग्राऊंडने या आजी आजोबांपासून त्यांचा सर्वात आवडता क्षण आणि आनंद हिरावून नेला.

ही छोटी परी घरी आली तेव्हा अवघी 2 महिन्यांची होती. मात्र त्याचवेळी डम्पिंगला भीषण आग लागली आणि त्याच्या धुराचा या चिमुरडीला प्रचंड त्रास झाला. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतर ती ठणठणीत बरी झाली. मात्र डम्पिंगमूळे तान्हुलीला भविष्यात पुन्हा आजार बळावण्याचा धोका असल्याने तिच्या आई बाबांनी कल्याण सोडून दुसऱ्या शहरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. या घटनेला आता काही महिने होत आहेत. मात्र आजही आपल्या नातीची आठवण आली किंवा कोणीही विषय काढल्यावर या आजी आजोबांचे डोळे पाणावतात. या दोघानाही आज त्यांची कोणतीही चूक नसताना एकमेकांच्या प्रेमाला, सहवासाला, आनंदला मुकावे लागत आहे.

इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरच राजकारण्यांनीही आता या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. एखाद्या सामाजिक प्रश्नाचे इतकेही राजकारण करू नये की तो कोणाच्या जीवावर, संसारावर आणि नात्यांवर उठेल.
डम्पिंगच्या या ज्वलंत प्रश्नासाठी महापालिका अधिकारी आणि राजकारणी नागरिकांचे आणखी किती शिव्या शाप खाणार आहेत?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*