Home ठळक बातम्या प्रतिकं उभारण्यापेक्षा त्यांचा मूळ संदेश लोकांमध्ये रुजणे आवश्यक – रघुजीराजे आंग्रे

प्रतिकं उभारण्यापेक्षा त्यांचा मूळ संदेश लोकांमध्ये रुजणे आवश्यक – रघुजीराजे आंग्रे

कल्याण दि.4 नोव्हेंबर :
केवळ प्रतिकं उभी करणे काही कामाचे नाही. आपल्या देशाच्या प्रत्येक गल्लीबोळात अशी प्रतीकं असून त्यापासून जाणारा संदेश लोकांमध्ये रुजणे सर्वात महत्वाचे असल्याचे परखड मत सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे यांनी कल्याणात व्यक्त केले. आजच्या दिवशी वसुबारसेच्या तिथीला छत्रपती शिवाजी महाराजांनी भिवंडी आणि दुर्गाडी किल्ला स्वराज्यात सामिल करत स्वराज्याच्या पहिल्या आरमाराचा पाया रचला. त्याला 361 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय इतिहास संकलन समितीतर्फे साजऱ्या करण्यात आलेल्या ‘इतिहास दिना’च्या कार्यक्रमात ते बोलत होते.

24 ऑक्टोबर 1654 रोजी वसुबारसेच्या मुहूर्तावर छत्रपतींनी आरमाराची स्थापना करीत मराठा नौदलाची पहिली बोट दुर्गाडीच्या साक्षीने समुद्रात उतरवली. त्यातून महाराजांनी ही सत्ता आमची, ही भूमी आमची आणि हा समुद्रही आमचाच असा थेट संदेश दिला. साडेतीनशे वर्षांपूर्वी महाराजांनी याचे महत्व ओळखल्याचे रघुजीराजे म्हणाले. तर दुर्गाडी गणेशघाट परिसरात या आरमाराचे स्मारक उभारण्याबाबत बोलताना ते म्हणाले की नुसती प्रतीकं उभारण्यापेक्षा त्यांचा संदेश लोकांपर्यंत जाणे आणि हा संदेश आपल्या जीवनात अंगीकारणे हे अधिक महत्वाचे आहे.

तत्पूर्वी रघुजीराजे यांच्या हस्ते दुर्गाडी खाडीमध्ये विधिवत जलपूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीची ढोल ताशांच्या गजरात शोभायात्राही काढण्यात आली. त्यानंतर रघुजीराजे यांनी ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर जाऊन दुर्गाडी देवीचे दर्शनही घेतले.

तर भारतीय इतिहास संकलन समितीच्या माध्यमातून गेल्या 6 वर्षांपासून हा इतिहास दिन साजरा करण्यात येत आहे. याठिकाणी इतिहासाच्या अभ्यासासाठी एखादे केंद्र उभे राहावे. ज्यातून इतिहासातील पुराव्यांची मोडतोड न होता योग्य पुरव्यानिशी योग्य तोच इतिहास लोकांपर्यंत पोहोचेल अशी संकलन समितीची भूमिका असल्याचे समितीच्या चंद्रकांत जोशी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*