Home ठळक बातम्या साडेसात लाखांच्या वीज चोरीप्रकरणी डोंबिवलीतील हॉटेल चालकावर गुन्हा

साडेसात लाखांच्या वीज चोरीप्रकरणी डोंबिवलीतील हॉटेल चालकावर गुन्हा

 

गुन्हा दाखल होताच हॉटेल चालकाने भरली वीजचोरीची रक्कम 

डोंबिवली दि.10 नोव्हेंबर :

डोंबिवलीच्या फडके रोडवर असणाऱ्या हॉटेलमध्ये गेल्या अकरा महिन्यात 7 लाख 59 हजार रुपये किंमतीची 46 हजार 523 युनिट विजेची चोरीचा प्रकार महावितरणच्या कारवाईत उघडकीस आला आहे. याप्रकरणी महावितरणने हॉटेल चालकाविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरणच्या कल्याण परिमंडलात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम सुरु असून या मोहिमेंतर्गत फडके रोडवरील लक्ष्मी बाग इस्टेट येथील उर्मी हॉटेलच्या (वीज बिलावरील नाव स्प्लेंडर शेल्टर प्रा. लि.) मीटरची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मीटरचा डिस्प्ले नादुरुस्त झाल्याचे आणि मीटरशी छेडछाड केल्याचे महावितरणच्या पथकाला आढळून आले. त्यामुळे हे संशयित मीटर ताब्यात घेऊन ग्राहकासमक्ष महावितरणच्या कार्यालयात अधिक तपासणी करण्यात आली. यात अतिरिक्त सर्किटच्या माध्यमातून मीटर बायपास करून वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाल्याचे महावितरणकडून संगण्यात आले. त्यामूळे महावितरणचे सहायक अभियंता योगिता कर्पे यांच्या फिर्यादीवरून हॉटेल चालक पुनीत शहा यांच्याविरोधात वीज कायदा 2003 च्या कलम 135 नुसार वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

दरम्यात हॉटेल चालक पुनीत शहा यांनी  वीजचोरीचे 7 लाख 59 हजार रुपयांचे बिल भरले असून दंडाच्या आकारणीची मागणी केल्याचेही महावितरणकडून सांगण्यात आले. डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रमोद पाटील, सहायक अभियंता योगिता कर्पे आणि संतोष बोकेफोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा