Home ठळक बातम्या कल्याणात गॅस गळतीमुळे आग ; माजी फोर्स वन कमांडो आणि स्थानिकांच्या धाडसामुळे...

कल्याणात गॅस गळतीमुळे आग ; माजी फोर्स वन कमांडो आणि स्थानिकांच्या धाडसामुळे वाचले कुटुंबाचे प्राण

रंगकामाची परांची ठरली जीवरक्षक शिडी

कल्याण दि. २९ नोव्हेंबर :
घरगुती गॅस सिलेंडरमधून झालेल्या गळतीमुळे कल्याणात घराला आग लागल्याची घटना आज संध्याकाळी घडली. विशेष म्हणजे माजी फोर्स वन कमांडोसह स्थानिक युवकांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्यामुळे घरातील सहा महिन्यांच्या चिमुकल्यासह सहा जणांचा जीव वाचू शकला. कल्याण पश्चिमेच्या आरटीओ परिसरात असलेल्या सर्वोदय हाईट इमारतीत हा प्रकार घडला.

या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या कौर कुटुंबियांच्या घरामध्ये संध्याकाळी सहा ते साडे सहा वाजण्याच्या सुमारास गॅस गळतीमुळे आग लागली. त्याचवेळी याच इमारतींमध्ये असलेल्या सर्व्हीस सेंटरमधील सूर्या आणि विनायक केणे या दोघा तरुणांनी लागलीच धाव घेतली. तर मुंबई पोलीस दलात पोलीस नाईक म्हणून नेमणुकीला असणारे माजी फोर्स वन कमांडो दिपक घरत हेही त्याचवेळी आपल्या मुलाला घरी घेऊन चालले होते. त्यांनीही मागचा पुढचा विचार न करता आपल्या मुलाला गाडीवर बसवले आणि आग लागलेल्या घराकडे मदतीसाठी धाव घेतली. या इमारतीच्या रंगकामासाठी रस्त्यालगत बाहेरून बांबूची परांची बांधण्यात आली होती.

या परांचीवरूनच सूर्या, विनायक केणे आणि दिपक घरत हे सरसर वर चढून गेले आणि आग लागलेल्या घराच्या बाल्कनीतून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. तसेच परिसरातील आणखी काही धाडसी नागरिकांनीही मग त्यांच्या मागोमाग परांचीवर चढून घरत यांना मदतीचा हात दिला. बाल्कनीतून बांबूंच्या परंचीद्वारे या सर्व कुटुंबीयांना घरत यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुखरूप खाली उतरवले. या सर्वांनी सर्वात आधी आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या लहान बाळाला सुखरूपणे खाली उतरवले. त्यानंतर घरातील आजोबांना तर थेट आपल्या खांद्यावर घेत सुखरूपणे बाहेर काढले. त्यानंतर तिथल्याच एका व्यक्तीने मोठी शिडी आणल्यानंतर मग घरात अडकलेल्या महिलांना खालती आणले.

तर या सर्वांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर सर्व्हिस सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या सूर्याने नंतर आग विझवण्यासाठी थेट दुकानांच्या पत्र्यांवर चढला. मात्र आग विझवण्याच्या प्रयत्नात पत्रा तुटून तो खाली पडल्याने त्याचा हात फ्रॅक्चर झाल्याची माहिती माजी नगरसेवक दया गायकवाड यांनी दिली.

दरम्यान या घटनेत सहा महिन्यांच्या बाळाला काहीही इजा झाली नसली तरी दोन्ही महिला काही प्रमाणात भाजल्याची प्राथमिक माहिती असून त्यांच्यावर नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सहा महिन्यांच्या चिमुरड्याला वाचवल्याचा मोठा आनंद – दिपक घरत
या आगीमध्ये कुटुंबातील सर्वांचे प्राण आपण वाचवू शकलो ही निश्चितच आनंदाची बाब आहे. मात्र त्यातही या घटनेत सहा महिन्यांच्या त्या बाळाला वाचवल्याचा आनंद अधिक असल्याची प्रतिक्रिया दिपक घरत यांनी एल एन एन शी बोलताना दिली. तसेच आपण सध्या मुंबई पोलीस दलात पोलीस नाईक म्हणून काम करत असून यापूर्वी फोर्स वन कमांडो म्हणून काम केले आहे. त्यामुळे कमांडो ट्रेनिंग घेतले असल्याने त्याचा आपल्याला या घटनेत मोठा फायदा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा