कल्याण दि.26 जानेवारी :
कल्याणातील भीषण वाहतूक कोंडीचा फटका आज अग्निशमन दलालाही बसलेला पाहायला मिळाला. कल्याण पश्चिमेतील टिळक चौक परिसरातील बहुमजली इमारतीला आज भीषण आग लागली होती. त्यावेळी वाहतूक कोंडीमुळे कल्याण पूर्वेतून मदतीसाठी येणारी अग्निशमन दलाचे अतिरिक्त कुमक घटनास्थळी पोहोचू न शकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या भीषण आगीत इमारतीचा सातवा मजला पूर्णपणे जळून खाक झाला असून सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
कल्याण पश्चिमेतील टिळक चौक परिसरात असणाऱ्या सफायर या बहुमजली इमारतीमध्ये आज संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आग लागली. सुरुवातीला सातव्या मजल्यावर असणारी ही आग काही वेळातच सहाव्या मजल्यावर पोहोचली. आणि काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले.
आगीची माहिती मिळताच कल्याण पश्चिमेतील अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेचच आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. आगीची भीषणता पाहता कल्याण पूर्वेतील अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. मात्र वाहतूक कोंडीमुळे हे अग्निशमन दल पोहचू शकले नाही. त्यांच्या आधी भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ येथून आलेल्या अग्निशमन दलाचे जवान पोहचले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. देव्हाऱ्यात लावलेल्या दिव्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मात्र कल्याणातील वाहतूक कोंडी ही आता किती भयानक रूप धारण करीत आहे याचे पुन्हा एकदा या घटनेतून दर्शन घडले. तसेच टिळक चौकसारख्या अरूंद रस्ते असणाऱ्या परिसरात वाहतूक नियोजनाची गरजही स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.