वाढदिवसानिमित्त आंदोलन करून शासन – प्रशासनाचा निषेध
कल्याण दि.29 ऑगस्ट :
उल्हास नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या कामामध्ये शासन आणि प्रशासनाकडून होत असलेल्या हलगर्जीपणाविरोधात माजी नगरसेवकाकडून एक अनोखे आंदोलन छेडण्यात आले आहे. स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी नगरसेवक नितीन निकम हे चक्क उल्हास नदीमध्ये 12 तास उभे राहून आंदोलन करत आहेत. विशेष म्हणजे या आंदोलनादरम्यान ते पाण्याचा एकही घोट पिणार नाहीयेत.
उल्हास नदी…कल्याण डोंबिवलीतील लाखो लोकांची तहान या नदीतील पाण्यानेच भागवली जाते. केडीएमसीकडून या नदीतून पाणी उचलून मग शहरातील नागरिकांना त्याचा पुरवठा केला जातो. परंतु ठिकठिकाणी या नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण झाले आहे. काही ठिकाणी नाल्याचे तर काही ठिकाणी केमिकलचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीमध्ये सोडले जात आहे. परिणामी उल्हास नदी प्रदूषित झाली असून त्यावर कायमस्वरुपी उपाय योजनेच्या मागणीसाठी नितीन निकम हे गेल्या अनेक वर्षांपासून विविध मार्गाने आंदोलन करत आहेत. परंतु त्यानंतरही शासन – प्रशासन याबाबत कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याने लाखो लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभुमीवर स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नितीन निकम यांनी आज सकाळपासून हे अनोखे आंदोलन सुरू केले आहे. उल्हास नदीमध्ये उभे राहिले असून त्यांनी आपल्या हातामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाक्याचा एक फलकही धरला आहे.
तर हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे नाही, किंवा ते कोणत्याही पक्षाविरोधातही नाही. उल्हास नदीतील या केमिकलयुक्त दूषित पाण्यामुळे लहान मुले,महिला ज्येष्ठ नागरिक विविध आजारांनी त्रस्त आहेत. आणखी किती दिवस एखाद्या जिवंत प्रेतासारखे आपण हे सर्व सहन करायचे अशा शब्दांत नितीन निकम यांनी आपल्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आहे.