Home बातम्या सेवा विवेक सामाजिक संस्थेतर्फे आदिवासी महिलांच्या स्वयंरोजगारासाठी बांबू हस्तकलेचे मोफत प्रशिक्षण

सेवा विवेक सामाजिक संस्थेतर्फे आदिवासी महिलांच्या स्वयंरोजगारासाठी बांबू हस्तकलेचे मोफत प्रशिक्षण

 

पालघर दि.१४ सप्टेंबर :
गेल्या अनेक वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील आदिवासी गरुजू महिलांना घरकाम सांभाळून आर्थिक हातभार लावण्यासाठी सेवा विवेक सामाजिक संस्था कार्यरत आहे. आदिवासी महिलांना सन्मान जनक रोजगार प्राप्त होण्याच्या उद्देशाने संस्थेतर्फे त्यांना मोफत बांबू हस्तकलचे प्रशिक्षण दिले जात आहे. सेवा विवेक मार्फत बांबू हस्तकला स्वयंरोजगार निर्मिती सह बहुउदेशाने देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण वर्गाच्या १५ व्या आणि १६ व्या तुकडीची सुरवात दहिसर, धुकटन दांडेकरपाडा येथे झाली.

३० दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणामध्ये ७० आदिवासी महिला मोफत लाभ घेणार असून त्याचे उद्घाटन हिंदुस्तान प्रकाशन संस्थेचे अधक्ष तसेच सेवा विवेकचे मार्गदर्शक रमेश पतंगे , धुकटन दांडेकर पाडाचे सरपंच प्रसाद भोईर, दहिसर येथील शिक्षक दशरथ केणी सर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लुकेश बंड, प्रशिक्षण- विकास अधिकारी प्रगती भोईर या मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आदिवासी महिलांना बांबू हस्तकलेचे महत्त्व सांगितले. त्यापासून उपलब्ध होणाऱ्या रोजगाराची माहिती देत त्यांना प्रशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

पालघर तालुक्यातील दहिसर देवलीपाडा आणि धुकटन दांडेकरपाडा येथील प्रशिक्षण वर्गाला कुशल बांबू हस्तकला शिकलेल्या सेवा विवेक संस्थेतील कुशल प्रशिक्षक महिलांद्वारे हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सेवा विवेकच्या ग्रामपातळीवर बांबू ग्रामोद्योग उत्पादनाच्या माध्यमातून पालघर जिल्हातील ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने बांबूपासून अनेक आकर्षक वस्तू तयार करण्यात येत आहेत. या उद्योगासाठी मागील काही वर्षांपासून पालघर जिल्हातील आदिवासी महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करण्यात येत असून आतापर्यंत शेकडोहून अधिक महिलांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.

हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर महिलांनी बांबूपासून उत्तम दर्जेदार पर्यावरण पूरक उत्पादने तयार करण्यात हातखंडा मिळवला आहे. ज्यामध्ये आकाश कंदील ,राखी ,पेन होल्डर ,मोबाईल होल्डर , पत्राधर , फिंगर जॉइंट ट्रे तयार आदी सारख्या बांबू हस्तकलेच्या ३६ आकर्षक वस्तू तयार होत असून उत्पादनाच्या दर्जेदारपणामुळे चांगली मागणी आहे.

या मागणीचा थेट परिणाम पालघर जिल्हातील आदिवासी महिलांचा रोजगार निर्मितीवर होत असून त्यांना प्रशिक्षणानंतर घरच्या घरी रोजची कामे सांभाळून फावल्या वेळेत बांबूकाम करून रोजगाराची संधी मिळाली आहे .

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा