Site icon LNN

‘रेड वेव्ह’च्या माध्यमातून थॅलेसेमिया रुग्णांसाठी मोफत रक्त ; आयएमए कल्याणचा उपक्रम

२८ जूनच्या उपक्रमात अधिकाधिक रक्तदात्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

कल्याण | २० जून :
समाजातील गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी आणि थॅलेसेमिया रुग्णांच्या रक्ताची गरज भागविण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) कल्याण शाखेतर्फे ‘रेड वेव्ह’ रक्तदान महाअभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. “Donate Blood, Save Lives” हा संदेश घेऊन पुढील रविवारी २८ जून २०२६ हे रक्तदान शिबिर होणार असून रक्तदाते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने त्यात सहभागी होण्याचे आवाहन कल्याण आय एम एचे अध्यक्ष डॉ. राजेश राजू यांच्याकडून करण्यात आले आहे. (Free Blood for Thalassemia Patients Through ‘Red Wave’; IMA Kalyan Launches Noble Initiative)

कल्याण पश्चिम येथील खडकपाडा परिसरातील मोहन अल्टेझा, वसंत व्हॅली रोडवरील बॅन्क्वेट हॉल, पी-३ येथे सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत हे रक्तदान शिबिर होणार आहे. या शिबिरात संकलित होणारे रक्त थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिले जाणार असल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

“Together Let’s Create A Red Wave of Hope” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून समाजात रक्तदानाबाबत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. रक्तदान हे केवळ एका व्यक्तीचे प्राण वाचवत नाही, तर अनेक कुटुंबांना नवजीवन देण्याचे कार्य करते, असा संदेशही या माध्यमातून दिला जात आहे.

रक्तदानाचे फायदे सांगताना आयोजकांनी हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत, नव्या रक्तपेशींची निर्मिती आणि एखाद्याचा जीव वाचविल्याचे समाधान अशा महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केला आहे. या शिबिरात १८ ते ६५ वयोगटातील निरोगी व्यक्तींना रक्तदान करता येणार असून सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. राजेश राजू, सचिव डॉ. हिमांशू ठक्कर आणि खजिनदार डॉ. स्वाती शेलार यांच्या पुढाकाराने आणि कल्याण आयएमएच्या संपूर्ण टीमच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

रक्ताची गरज कधीही कोणालाही भासू शकते. त्यामुळे “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या भावनेतून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सामाजिक उपक्रमाला यशस्वी करावे, असे आवाहन आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. राजेश राजू यांनी केले आहे.

*रक्तदान शिबिरात सहभागी होण्यासाठी / नोंदणीसाठी संपर्क : ९६४६३ ९६४६३*

Exit mobile version