Site icon LNN

गणेशोत्सवानिमित्त कल्याण लोकसभेत मोफत बससेवा ; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तिकीट वाटपाचा शुभारंभ

डोंबिवली | ३० ऑगस्ट :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघातील चाकरमान्यांची गावची वाट यंदाही सुखकर होणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून आणि शिवसेना कल्याण लोकसभा यांच्या माध्यमातून गणेशभक्तांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत बससेवेच्या तिकीट वाटपाचा शुभारंभ शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी कळवा, दिवा आणि उल्हासनगर येथे करण्यात आला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रतिनिधिक स्वरूपात गणेशभक्तांना प्रवासाची तिकिटे वितरित केली. गणेशोत्सवाच्या दोन ते तीन दिवस आधी या विशेष बसगाड्या गावाकडे रवाना होणार असून, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या कोकणातील जिल्ह्यांसह सांगली, सातारा आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी ही मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Free Bus Service in Kalyan Lok Sabha Constituency on the Occasion of Ganeshotsav; Ticket Distribution Inaugurated in the Presence of MP Dr. Shrikant Shinde)

कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिवा, कळवा, कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ परिसरात कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने चाकरमानी वास्तव्यास आहेत. रोजगार आणि व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झालेल्या या नागरिकांसाठी गणेशोत्सव हा आपल्या गावाशी, कुटुंबाशी आणि मातीतल्या संस्कृतीशी जोडणारा एक जिव्हाळ्याचा सण आहे. त्यामुळे गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी गावी जाण्याची त्यांची लगबग सुरू होते. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे आणि एसटी सेवांवर मोठ्या प्रमाणात ताण येत असल्याने यामुळे चाकरमान्यांना मोठी कसरत करावी लागते. चाकरमान्यांच्या मनातील हीच सल ओळखून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना कल्याण लोकसभा यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त मोफत बससेवेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विशेष म्हणजे, सुखकर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच गणेशभक्तांना गणपती पूजेसाठी आवश्यक पूजा साहित्यही दरवर्षीप्रमाणे यंदा देण्यात येणार आहे. त्यामुळे गावी पोहोचल्यानंतर गणेशोत्सवाची तयारी करण्यासाठीही नागरिकांना मदत होणार आहे. या माध्यमातून रेल्वेच्या तिकिटांसाठी तासनतास रांगा लावणे किंवा अतिरिक्त पैसे भरण्यापासून चाकरमान्यांना पूर्णपणे मुक्त करणारा हा उपक्रम यंदाही हजारो कुटुंबांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या या कौतुकास्पद उपक्रमामुळे चाकरमान्यांचा हा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने आनंददायी आणि अविस्मरणीय ठरणार आहे. तसेच यावेळी गणेश भक्तांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले.

Exit mobile version