Site icon LNN

चरखा ते AI : कल्याणातील शेलार कुटुंबियांनी गणेशोत्सवात साकारला देशाच्या चार पिढ्यांचा प्रेरणादायी प्रवास

पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून काल बलिदान, आज बांधणी, उद्या उड्डाण’चा संदेश

कल्याण | १४ सप्टेंबर :
गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा, संस्कार आणि उत्साहाचा संगम. मात्र या उत्सवाच्या माध्यमातून समाजाला एखादा विचार देण्याचा प्रयत्न झाला, तर त्या उत्सवाला अधिक व्यापक अर्थ प्राप्त होतो. याच भावनेतून कल्याण पूर्वेतील शेलार कुटुंबीयांनी यंदाचा गणेशोत्सव एका संवेदनशील आणि विचारप्रवर्तक संकल्पनेला समर्पित केला आहे.

‘शेलारांचा विघ्नहर्ता’ या नावाने साकारण्यात आलेल्या या पर्यावरणपूरक गणेशोत्सवात ‘चरखा ते AI – काल बलिदान, आज बांधणी, उद्या उड्डाण’ या संकल्पनेतून भारताच्या चार पिढ्यांचा प्रवास मांडण्यात आला आहे. एका पिढीने दिलेला त्याग, दुसऱ्या पिढीने उभा केलेला देश आणि तिसऱ्या पिढीने स्वीकारलेले तंत्रज्ञान यापासून पुढील पिढीच्या स्वप्नांपर्यंतचा हा प्रवास या आरासेतून उलगडतो.

आजच्या काळात ‘Gen Z’ हा शब्द मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. मात्र प्रत्येक नवी पिढी ही आधीच्या पिढ्यांनी घडवलेल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय पायावर उभी असते. त्यामुळे पिढ्यांमधील बदल समजून घेताना त्यांच्या योगदानाकडेही तितक्याच आदराने पाहणे आवश्यक आहे. ‘काळ बदलला, प्रश्न बदलले आणि ते सोडवण्याचे मार्गही बदलले; मात्र प्रत्येक पिढीने आपल्या काळाची जबाबदारी पार पाडली,’ हा मूलभूत विचार शेलार कुटुंबीयांनी या देखाव्यातून मांडला आहे.

या संकल्पनेत बाप्पासोबत ‘टाईम मशीन’च्या माध्यमातून चार पिढ्यांची सफर घडवण्यात आली आहे. प्रत्येक पिढीचे वैशिष्ट्य, संघर्ष, योगदान आणि पुढील पिढीसाठी तिने निर्माण केलेला पाया यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

बलिदानाची पिढी : १८५७ ते १९४७…
स्वातंत्र्यपूर्व काळातील पिढीला ‘बलिदानाची पिढी’ म्हणून साकारण्यात आले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगतानाही या पिढीने स्वातंत्र्याचे स्वप्न जपले. देशप्रेम, त्याग, संघर्ष, स्वाभिमान आणि एकजुटीच्या बळावर त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात आपले योगदान दिले. आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेत असताना त्या काळातील असंख्य ज्ञात-अज्ञात व्यक्तींच्या त्यागाची जाणीव पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या भागातून करण्यात आला आहे.

बांधणीची पिढी : १९४७ ते १९९१…
स्वातंत्र्यानंतरच्या काळातील पिढीला ‘बांधणीची पिढी’ म्हणून स्थान देण्यात आले आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशासमोर राष्ट्रनिर्मितीचे मोठे आव्हान होते. लोकशाहीची मूल्ये रुजवणे, संविधानाचा पाया मजबूत करणे, शिक्षणाचा विस्तार, शेती आणि उद्योगाचा विकास तसेच देशाची एकात्मता आणि स्वावलंबन यासाठी या पिढीने मोठे योगदान दिले.‘त्याग, मेहनत आणि राष्ट्रनिर्माणातून आधुनिक भारताची पायाभरणी करणारी पिढी’ म्हणून तिच्या योगदानाचे स्मरण या देखाव्यातून करण्यात आले आहे.

जागतिक पिढी : १९९१ ते २०२६
तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणाच्या काळात वाढलेली पिढी ‘जागतिक पिढी’ म्हणून मांडण्यात आली आहे. इंटरनेट, मोबाईल, संगणक आणि आधुनिक शिक्षणामुळे जगाशी जोडले जाण्याच्या संधी या पिढीला मिळाल्या. ज्ञान, कौशल्य, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या पिढीने बदलत्या जगाशी जुळवून घेतले. मात्र आधुनिकतेचा स्वीकार करताना संस्कार, माणुसकी, निसर्गप्रेम आणि सामाजिक बांधिलकी जपणे तितकेच महत्त्वाचे आहे, असा संदेश या भागातून देण्यात आला आहे. मिळालेल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग केवळ वैयक्तिक प्रगतीसाठी नव्हे, तर समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी करण्याची जाणीव या पिढीने ठेवावी, असा विचार येथे मांडला आहे.

स्वप्नांची पिढी : २०२६ नंतर…
या प्रवासाचा सर्वात आशावादी टप्पा म्हणजे ‘स्वप्नांची पिढी’. २०२६ नंतरच्या पिढीकडे तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि डिजिटल साधनांचे नवे विश्व असेल. मात्र तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी त्याचा उपयोग मानवकल्याण, पर्यावरणसंवर्धन आणि शाश्वत विकासासाठी करण्याची जबाबदारी या पिढीची असेल. प्रदूषण कमी करणे, निसर्गाचे संरक्षण करणे, शाश्वत विकासाचे मार्ग शोधणे आणि भारताला सक्षम व विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार करणे, ही आगामी पिढीसमोरील मोठी जबाबदारी असल्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.

श्रद्धेसोबत पर्यावरणाचीही जपणूक…
या संपूर्ण देखाव्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पर्यावरणपूरक साहित्याचा वापर. पुठ्ठा, रंगीत कागद, क्ले आणि रंग अशा साहित्याचा वापर करून ही आरास साकारण्यात आली आहे. गणरायाच्या भक्तीसोबत पर्यावरणाची काळजी घेता येते आणि उत्सवाच्या माध्यमातून समाजाला सकारात्मक विचारही देता येतो, हे शेलार कुटुंबीयांनी कृतीतून दाखवून दिले आहे. या संकल्पनेमागे दिनेश धोंडीराम शेलार आणि चित्रा दिनेश शेलार यांची कल्पना असून, प्रतिमा शेलार, दुर्वेश शेलार, रोहन गणेश शेलार, प्रियंका रोहन शेलार आणि युविका रोहन शेलार (माऊ)यांनी देखावा साकारण्यासाठी योगदान दिले आहे.

एका पिढीने स्वातंत्र्यासाठी त्याग केला, दुसऱ्या पिढीने राष्ट्र उभारले, तिसऱ्या पिढीने जगाशी नाते जोडले आणि आता पुढील पिढीसमोर नवे क्षितिज खुले आहे. याच विचाराला बाप्पाच्या साक्षीने शब्द देत शेलार कुटुंबीयांनी दिलेला संदेश साधा, पण अर्थपूर्ण आहे— ‘चरखा ते AI… काल बलिदान, आज बांधणी, उद्या उड्डाण!’

Exit mobile version