Home ठळक बातम्या ग्रामीण भागातील स्टार्टअपसाठी नाविन्यपूर्ण योजनेतून निधी द्या – खासदार डॉ. श्रीकांत...

ग्रामीण भागातील स्टार्टअपसाठी नाविन्यपूर्ण योजनेतून निधी द्या – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची डीपीडीसीमध्ये मागणी

ठाणे दि.११ नोव्हेंबर :

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तरुणांना फायदा होईल, अशा स्टार्टअप शिबिरांचे आयोजन नाविन्यपूर्ण योजनेमध्ये करण्याची गरज असून त्यासाठी निधी देण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत केली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात घनकचरा व्यवस्थापनासारखे प्रकल्प महिला बचत गटांच्या माध्यमातून यशस्वीरित्या होऊ शकतात. सोबतच जिल्ह्यात दिव्यांग पुनर्वसन केंद्र नसून त्यासाठीही निधी देण्याची आग्रही मागणी डॉ. शिंदे यांनी या बैठकीत केली. ठाण्याच्या नियोजन भवनात राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. याप्रसंगी ठाणे जिल्ह्याच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली.

ठाण्याच्या नियोजन भवनात शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई पालकमंत्रीपदी नियुक्त झाल्यानंतर ही पहिलीच बैठक होती. या बैठकीत विविध लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या बैठकीत नाविन्यपूर्ण योजनेत नाविन्य असलेल्या प्रकल्पांना प्राधान्य देण्याची आग्रही मागणी केली. ठाणे जिल्ह्यात नाविन्यपूर्ण योजनेमधून तरुणांच्या स्टार्टअपला शिबिराच्या माध्यमातून संधी देण्याची मागणी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या बैठकीत केली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही प्रश्न आहेत. रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग वाढत आहेत. ग्रामीण भागातील घनकचऱ्याचा हा प्रश्न वाढतो आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन करणे शक्य होऊ शकते. तसेच ग्रामीण भागातून एखादा स्टार्टअप यासाठी उपाय घेऊन आल्यास त्याचा फायदा होईल. स्टार्टअपला संधी दिल्याने अनेक प्रकल्प समोर येतील. तसेच त्यातून ग्रामीण भागात रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल. त्यामुळे नाविन्यपूर्ण योजनेतून अशा स्टार्टअप शिबिरांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.

फ्युनीकुलर ट्रेनमार्गाचे स्ट्रक्चरल ऑडिट करा

कल्याण लोकसभा मतदारसंघातील मलंगगडावर गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या फ्युनीकुलर ट्रेन प्रकल्पातील उभारणी करण्यात आलेल्या रूळ आणि इतर साहित्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. हा प्रकल्प कंत्राटदाराच्या कारभारामुळे रखडला आहे. त्याच्याकडून काम का काढून घेण्यात आले नाही, असा प्रश्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला. सध्या या प्रकल्पाची काय स्थिती आहे हे कळणे गरजेचे असून त्यासाठी आयआयटी सारख्या संस्थेकडून याचे ऑडिट होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी मांडले. त्यावर बोलताना येत्या पंधरा दिवसात या प्रकल्पाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

कुशिवली धरण वेगाने मार्गी लावा

अंबरनाथ तालुक्यात कुशिवली येथे प्रस्तावित असलेल्या धरणाच्या कामाला गती देण्याची विनंती या बैठकीत खासदार डॉ. शिंदे यांनी केली. यात असलेल्या समस्या तातडीने सोडवण्याच्या सूचना संबंधितांना करण्याची मागणी डॉ. शिंदे यांनी पालकमंत्री देसाई यांच्याकडे केली. सध्या जिल्ह्यात नव्या जलस्रोतांची गरज आहे. कुशिवली धरण झाल्यास त्याचा फायदा होईल. आसपासच्या भागांचा पाणीप्रश्न सुटेल असेही मत खासदार डॉ. शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले.

जलजीवन मिशन उत्तम योजना…

केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेमुळे ग्रामीण भागात मोठा फायदा झाला आहे. यासाठी मोठा निधी उपलब्ध होतो आहे. ज्या भागात पाणी नव्हते तिथे पाणी पोहोचवण्याचे म्हत्वाचे काम या योजनेने केले. त्यामुळे ही योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केली. सोबतच या योजनेसह अमृत टप्पा २ मधील कामांना गती देण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्त करण्याची सूचना यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी केली.

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारा…

जिल्ह्यात अद्याप जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नाही. त्यावर जिल्हा परिषद काम करत आहे पण त्यासाठी निधी द्या. गरज पडल्यास नाविन्यपूर्ण योजनेतून यासाठी निधी द्या, अशीही मागणी यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी केली. दिव्यांग बांधवांच्या पुनर्वसनासाठी अधिकचा निधी देण्याची मागणीही यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना केली.

महिला बचत गटांना निधी द्या…

महिला बचत गटांना घनकचरा व्यवस्थापनात समाविष्ट करण्यासोबतच त्यांना इतर व्यवसाय उद्योगासाठी साहित्य पुरवा. त्यासाठी त्यांना निधी देण्याची मागणी खासदार डॉ  शिंदे यांनी केली. यासाठी अधिकची तरतूद करण्याचेही त्यांनी सुचवले.

स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उभारा…

ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र सुस्थितीत करण्याची मागणी यावेळी डॉ. शिंदे यांनी केली. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट करण्यासाठी पाऊले उचलण्याचेही डॉ. शिंदे यांनी सुचवले. त्यावर बोलताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यातील १४ प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट करण्याचे नियोजन असल्याचे स्पष्ट केले.

वनक्षेत्रात बंधारे बांधा…

ग्रामीण भागात वनक्षेत्र परिसरात बंधारे बांधण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून प्रस्ताव मागवण्याचे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. ग्रामीण भागात अनेक भाग आहेत जिथे बंधारे होण्याची आवश्यकता आहे. मात्र हे होताना दिसत नाही. याबाबत प्रस्ताव नाहीत. हे प्रस्ताव घेताना स्थानिक लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घ्या, असेही आवाहन यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी केले. त्यावर बोलताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधितांना सूचना केल्या. चेक डॅम बांधण्यासाठीही लोकप्रतिनिधींना जागा सुचवण्याबाबत कळवण्याचे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले.

लघुपाटबंधारे विभागाने बंधाऱ्याचे प्रस्ताव मागवावेत…

लघु पाटबंधारे विभागाला बंधारे बांधण्यासाठी २९ कोटींचा आराखडा आहे. मात्र त्याचे किती प्रस्ताव आहेत याची कल्पना नाही. जिल्ह्यातल्या ठराविक भागात हे बंधारे न बांधता जिल्ह्यातल्या सर्वच आमदारांकडून यासाठी प्रस्ताव मागवा. तसे पत्र जिल्हा प्रशासनाने लोकप्रतिनिधी यांना पाठवावेत अशी सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली.

अंगणवाडीसाठी निधी द्या…

या बैठकीत अंगणवाडी, शाळा आणि क्रीडा सुविधा उभारण्यासाठी निधीची तरतूद वाढवण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. सुधारित आराखड्यात तशी सुधारणा करू असे आश्वासन यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा