Home ठळक बातम्या नोटबंदीच्या दुसऱ्या वर्षपूर्तीनिमित कल्याणात काँग्रेसकडून ‘काळ्या पैशांची अंत्ययात्रा’

नोटबंदीच्या दुसऱ्या वर्षपूर्तीनिमित कल्याणात काँग्रेसकडून ‘काळ्या पैशांची अंत्ययात्रा’

कल्याण दि.12 नोव्हेंबर :

केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाचा कल्याणात काँग्रेसकडून काळ्या पैशांची अंत्ययात्रा काढून अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला. ‘राम नाम सत्य है, मोदी सरकार भ्रष्ट है यासारख्या घोषणांची जोरदार घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली. कल्याण शहर जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात कल्याण डोंबिवलीतील अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर केंद्र सरकारचा निषेध म्हणून जिल्हाध्यक्ष पोटे यांनी मुंडन करीत आपला रोष व्यक्त केला.

कल्याणच्या शिवाजी महाराज चौकातून निघालेला हा मोर्चा तहसिल कार्यालयावर नेण्यात आला. बरोबर दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने काळ्या पैशांविरोधात सर्जिकल स्ट्राईक करीत नोटबंदीचा निर्णय जाहीर केला. मात्र या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास झाला, नोटा बदलण्यासाठी रांगेत उभ्या असणाऱ्या काही नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगत हा निर्णय म्हणजे एकप्रकारे फसवणूक असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्याकडून करण्यात आला.

तसेच यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. या कल्याण शहर जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये ब्रिज दत्त, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, संतोष केणे, अमित म्हात्रे, मनिष देसले यांच्यासह कल्याण आणि डोंबिवलीतील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान मोर्चातील शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे एक निवेदन तहसिलदारांना सादर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*