Home क्राइम वॉच कसारा – कल्याण दरम्यान देवगिरी एक्स्प्रेसमध्ये दरोडा घालणारी टोळी गजाआड

कसारा – कल्याण दरम्यान देवगिरी एक्स्प्रेसमध्ये दरोडा घालणारी टोळी गजाआड

१० ते १५ प्रवाशांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटले

कल्याण दि.८ डिसेंबर :
नांदेडहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसमध्ये आठ ते दहा जणांच्या टोळक्याने चाकू, ब्लेडचा धाक दाखवत दहा – पंधरा प्रवाशांना लुटल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली होती. देवगिरी एक्सप्रेसने कसारा स्टेशन सोडल्यानंतर या दरोडेखोरांनी तब्बल तासभर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. याबाबत रेल्वे प्रवाशांनी रेल्वे कंट्रोल रुमला माहिती देताच कल्याण रेल्वे पोलिसांनी कल्याण रेल्वे स्टेशनवर सापळा रचत सहा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या असून दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे.

मंगळवारी ६ डिसेंबरला पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास देवगिरी एक्सप्रेसने कसारा स्थानक सोडल्यानंतर नशेमध्ये दंग असणारे आठ जण मेल एक्स्प्रेसच्या बोगी क्रमांक एस 1 आणि एस 2 मध्ये शिरले. आणि त्यांनी धारदार शस्त्र दाखवत प्रवाशांच्या वस्तू आणि पैसे हिसकावून घेतले. तर ज्या प्रवाशांनी विरोध केला त्यांना मारहाणही केली गेली. हा सर्व प्रकार जवळपास एक तासभर सुरू होता.

दरम्यान त्यातील काही प्रवाशांनी धाडस करत कल्याण रेल्वे कंट्रोलला या प्रकाराची माहिती दिली. त्यावरून कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक कल्याण स्थानकात पोहोचले. आणि कल्याण स्टेशनवर ही गाडी येताच पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतले. तर ट्रेनमध्ये असणाऱ्या पोलिसांच्या आणखी एका पथकाने ठाणे आणि दादर स्टेशन येईपर्यंत इतर आरोपींना ताब्यात घेतले.

याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना पोलिसांनी रोहित जाधव , विलास लांडगे,कपिल उर्फ प्रकाश निकम, करण वाहने,राहुल राठोड,निलेश चव्हाण यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले. हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून औरंगाबादचे रहिवासी असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून त्यांनी आतापर्यंत किती गुन्हे केले आहेत याचा तपास पोलीस करत आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा