Home ठळक बातम्या आमचा अंत पाहू नका नाही तर नेवाळीपेक्षा उग्र आंदोलन करू – ग्रामस्थांचा...

आमचा अंत पाहू नका नाही तर नेवाळीपेक्षा उग्र आंदोलन करू – ग्रामस्थांचा सरकारला इशारा

कल्याण दि.27 नोव्हेंबर :
सरकारने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. अन्यथा नेवळीपेक्षा उग्र आंदोलन करू असा संतप्त इशारा आगरी कोळी समाजाने दिला आहे. कल्याण पश्चिमेच्या गौरीपाडा गावातील जागेचे आज शासनातर्फे सर्वेक्षण केले जाणार होते. मात्र स्थानिकांच्या तीव्र विरोधामुळे शासकीय अधिकाऱ्यांना सर्वेक्षण न करताच परत जावे लागले. त्यावेळी संबंधित जागेवर झालेल्या ग्रामसभेत बोलताना ग्रामस्थांनी हा इशारा दिला.

गौरीपाडा गावातील गुरचरण जागेवर काशी कापडी समाजासाठी आरक्षित करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यासाठी आज या जागेचे शासनामार्फत सर्वेक्षण करण्यात येणार होते. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध केल्याने शासनाला सर्वेक्षण न करताच रिकाम्या हाताने माघारी जावे लागले. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांचे एक निवेदनही शासकीय कर्मचाऱ्यांना दिले.

दरम्यान यावेळी झालेल्या ग्रामसभेमध्ये आगरी कोळी समाजाच्या नेत्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने आमच्या जागा, जमिनीवर आरक्षण टाकले. मात्र विकासाची भूमिका लक्षात घेऊन आम्ही त्याला विरोध केला नाही. परंतु आता आमचा समाज एकत्र झाला असून यापूढे कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही. आम्ही शांततेच्या आणि कायदेशीर मार्गाने आमची लढाई लढणार आहोत. परंतु त्यानंतरही प्रशासनाने आमच्या जमिनी हिसकावणे सुरूच ठेवले तर मात्र आम्ही शांत राहणार नाही. वेळ पडल्यास नेवळीपेक्षा उग्र आंदोलन छेडण्याची वेळ आमच्यावर येईल असा संतप्त इशारा आगरी कोळी उत्कर्ष समाजाचे नेते विश्वनाथ भोईर यांनी दिला. विशेष म्हणजे गौरीपाडा गावातील ग्रामस्थांसह शेजारील गावातील अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

स्थानिकांच्या उग्र भूमिकेपूढे सध्या तरी प्रशासनाने नमते घेतले असून आगामी काळात शासन नेमकी काय भूमिका घेते हे लवकरच स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*