कल्याण दि.21 सप्टेंबर :
अवयवदानाबाबत समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी
जायंट्स वेलफेअर फाऊंडेशन आणि फेडरेशन फॉर ऑर्गन अँड बॉडी डोनेशनच्या संयुक्त विद्यमाने “अवयवदानाचे लोकरंग” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण पश्चिमेच्या कोकण वसाहत येथील सदगुरू श्री. वामनराव पै सभागृहात मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. (Giants Welfare Foundation and Federation for Organ and Body Donation organize folk dances in Kalyan to raise awareness about organ donation)
भारुड आणि गोंधळ या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लोककलांच्या माध्यमातून अवयवदानाचे महत्त्व रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा हा बहुधा पहिलाच आणि अभिनव प्रयत्न होता. संत एकनाथांनी प्रचारित केलेले भारुड हे नाट्यमय गीत समाजाला आध्यात्मिक आणि नैतिक संदेश देणारे असून गोंधळ ही देवीच्या उपासनेसाठी सादर होणारी पारंपरिक नृत्य-नाट्यकला आहे. या दोन्ही कला प्रकारांचा अतिशय उत्तम संगम साधत सुनील देशपांडे यांच्या संकल्पनेतून हा आगळावेगळा उपक्रम साकार झाला. ज्यासाठी माजी नगरसेवक संजय पाटील यांनी मोफत हे सभागृह उपलब्ध करून दिले होते.
या कार्यक्रमाची संहिता सुनील देशपांडे आणि जालिंदर केरे यांनी तयार केली होती. तर अवयवदानाचा लोकजागर हे भारुड सम्राट शाहीर जालिंदर केरे आणि मंडळींनी सादर केले. छत्रपती संभाजीनगर येथून खास या निमित्ताने पथकाने आगमन केले होते.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी जायंट्स वेलफेअर फाउंडेशन फेडरेशन 1 C चे अध्यक्ष डॉ. किशोर देसाई, नागराजन अय्यर यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला जायंट्स वेलफेअर फाऊंडेशनचे स्पेशल कमिटी मेंबर्स जीवराजभाई नगारिया आणि अशोक मेहता माजी नगरसेवक संजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.