Home ठळक बातम्या 471 कोटींचे पुरावे द्या अन्यथा फसवणुकीचा गुन्हा दाखल करू – शिवसेनेचा आमदार...

471 कोटींचे पुरावे द्या अन्यथा फसवणुकीचा गुन्हा दाखल करू – शिवसेनेचा आमदार रविंद्र चव्हाणांना इशारा

 

डोंबिवली दि.17 डिसेंबर :
471 कोटी निधीच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप आमदार यांच्यात डोंबिवलीत सुरू झालेला संघर्ष दिवसागणिक अधिक तीव्र होताना दिसत आहे. 471 कोटींचा निधी मंजूर झाल्याबाबत भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी पुरावे सादर करावे अन्यथा डोंबिवलीकरांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करू असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.

गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना आमदार रविंद्र चव्हाण यांनी 471 कोटी निधीच्या मुद्द्यावरून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदेंवर टिका केली होती. त्यावर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेने आमदार चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली.

डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण वारंवार 472 कोटीच्या रस्ते विषयांवर शिवसेनेवर टीका करायचे काम करत आहेत. प्रत्यक्षात त्यांनी कोणतेही काम केले नसून स्वतःच्या चुकांना पाठीशी घालण्याचे काम सुरू असल्याचे दिपेश म्हात्रे यांनी सांगितले. आमदार चव्हाण हे वारंवार निधी आणल्याचे बोलत आहेत, परंतु 472 कोटी मुळात मंजुरच झालेले नाही की कोणतीही तांत्रिक मंजुरी मिळाली नाहीये. जर निधीच मंजूर नव्हता तर भूमिपूजनाचे नारळ कसे काय फोडले? तसेच गेल्या 15 वर्षांपासून ते 3 वेळा आमदार आहेत, राज्यमंत्रीपदही त्यांनी भूषवले आहे. या 15 वर्षातील आमदार निधी कुठे गेला? राज्यमंत्री असताना किती निधी आणल्याचा सवाल करत आमदार, राज्यमंत्री असताना विकास केला असता तर आज वेंगुर्ल्याच्या जायची गरज पडली नसती असेही दिपेश म्हात्रे यांनी सांगितले.

केंद्र सरकारने आकस धरून कल्याण स्टेशन रिमॉडेलिंग निधी, जलवाहतूक निधी अद्याप केंद्राने रद्द केला आहे. त्यासाठी आमदार चव्हाण बोलणार नाहीत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे धडाडीपणे विकासाचे काम करत असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आमदार रविंद्र चव्हाणांनी निधी मंजूर असल्याचे पुरावा सादर करावे, ते नसल्यास डोंबिवलीकरांची माफी मागावी. डोंबिवलीकरांची फसवणूक केल्याप्रकरणी आम्ही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा दिपेश म्हात्रे यांनी यावेळी दिला आहे.

यावेळी शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, उपजिल्हा प्रमूख राजेश कदम आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा