Home ठळक बातम्या गुडन्यूज : अखेर कल्याणच्या डम्पिंगवर कचरा टाकणे झाले बंद

गुडन्यूज : अखेर कल्याणच्या डम्पिंगवर कचरा टाकणे झाले बंद

 

कल्याण – डोंबिवली दि.25 मे :
गेल्या अनेक वर्षांपासून मोठी डोकेदुखी ठरलेल्या वाडेघर डम्पिंग ग्राऊंडची समस्या कायमस्वरूपी सुटण्याच्या दृष्टीने केडीएमसीने अतिशय महत्वाचा टप्पा गाठला आहे. गेल्या 2 दिवसांपासून वाडेघर डम्पिंगवर कचरा टाकणे पूर्णपणे बंद झाल्याची महत्वपूर्ण माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत इथल्या कचऱ्याच्या डोंगराच्या जागी सुंदर उद्यान फुललेले दिसल्या आश्चर्य वाटायला नको. (Good News: Garbage dumping at Kalyan dumping has finally stopped)

एकीकडे कोवीडमूळे निर्माण झालेली भयानक परिस्थिती, अनेक तांत्रिक अडचणी आणि झारीतील शुक्राचार्यांनी आणलेल्या असंख्य अडथळ्यांवर मात करत अवघ्या वर्षभरात केडीएमसी प्रशासनाने हा प्रश्न मार्गी लावला आहे. बरोबर गेल्या वर्षभरापासून घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कचऱ्याचे वर्गीकरण बंधनकारक करणारी महत्वाकांक्षी ‘शून्य कचरा मोहीम’ राबवण्यास सुरुवात केली. त्याच्या जनजागृती आणि प्रसारासाठी त्यांनी तब्बल 200 ठिकाणी जाऊन लोकांशी संवाद साधत त्यांना कचरा वर्गीकरणाचे महत्व पटवून दिले. परिणामी वर्षभरापूर्वी केवळ 10 मेट्रिक टन वर्गीकरण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण आजमितीस थेट 500 मेट्रिक टनांवर जाऊन पोहोचल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. त्यातही 250 मेट्रिक टन ओला आणि 200 मेट्रिक टन सुका कचऱ्याचा समावेश आहे. तर इलेक्ट्रॉनिक वस्तू, काचा, कागद, प्लॅस्टिक कचरा उचलण्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त करण्यात आल्या असून त्या महापालिकेला रॉयल्टी देत आहेत. तर कल्याण डोंबिवलीमध्ये आजच्या घडीला 50 गृहनिर्माण सोसायट्या अशा आहेत ज्या स्वतःच्या कचऱ्यावर प्रक्रिया करून कंपोस्ट तयार करत आहेत. त्यामुळे वाडेघर येथील कचरा टाकणे बंद होण्यामागे या सर्व एनजीओ, हौसिंग सोसायटी आणि सर्वात महत्वाचा म्हणजे इथल्या नागरिकांनी केलेलं सहकार्य मोठे असल्याचेही महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

*सध्या असणारा कचऱ्याचा डोंगर असा हटवणार…*
वाडेघर डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकणे बंद झाल्यावर आता सध्या अस्तित्वात असणारा कचऱ्याचा डोंगर बायोमायनिंग करून हटवला जाणार आहे. इथे असणारा सर्व कचरा दुसरीकडे हलवला जाणार असून त्यातील काही कचऱ्याचे कंपोस्ट तर उर्वरित लँडफिलिंगसाठी वापरला जाणार असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. त्यानंतर रिकाम्या होणाऱ्या जागेवर स्मार्टसिटी प्रकल्पांतर्गत जॉगिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅकसह सुंदर उद्यान विकसित होणार असल्याचेही डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून डोकेदुखी ठरलेला डम्पिंगचा हा प्रश्न सोडवण्यासाठी नागरिकांनी केलेले सहकार्य जितके महत्वपुर्ण आहे. तेवढेच प्रशासनाने दाखवलेली इच्छाशक्तीचेही कौतुक करावे तितके कमी ठरेल. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दाखवलेल्या प्रबळ इच्छाशक्तीचाही यामध्ये सिंहाचा वाटा आहे हे निश्चित.

मागील लेख45 वर्षांवरील नागरिकांचे उद्या (25मे) कल्याण-डोंबिवलीत 13 ठिकाणी लसीकरण
पुढील लेखम्हाडा सोडतीतील ती घरे नियमानुसारच; म्हाडाकडून छाया राठोड यांना क्लिनचिट

१ कॉमेंट

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा