खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश
कल्याण दि.6 ऑक्टोबर :
कल्याण अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावरील सर्वात महत्त्वाचा आणि एकमेव दुवा असलेल्या शहाड पुलाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. सध्या दोन पदरी असणारा हा उड्डाणपूल चार पदरी (four lane) केला जाणार असून एमएमआरडीएकडून ३२० कोटींची निविदा जाहीर करण्यात आली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. (Good news: Shahad flyover will be four-laned; 320 crore tender announced by MMRDA)
उड्डाणपुलाचे विस्तारीकरण करण्याची मागणी…
कल्याण – उल्हासनगरसह अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून अहिल्यानगर आणि परिसराला जोडणारा शहाड रेल्वे उड्डाणपूल महत्वाचा आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार शहाड स्टेशन येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कल्याण बाजूच्या रस्त्याची रुंदी ३० मीटर असून उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील ३६ मीटर आहे. या उड्डाणपुलावरची वाहतूक गेल्या काही वर्षात प्रचंड वाढली आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही दिशेला चार पदरी रस्ता असला तरी उड्डाणपूल दुपदरी असल्याने अनेकदा उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंच्या प्रवेशद्वारावर कोंडी होत असते. कधी कधी एखादे वाहन उड्डाणपुलावर बंद पडल्यास अथवा उड्डाणपुलाची दुरूस्ती हाती घेतल्यास एकाच मार्गिकेवरून वाहतूक होते. परिणामी दोन्ही बाजूने वाहतुकीची मोठी कोंडी होऊन नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या उड्डाणपुलाचे विस्तारीकरण करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात होती. त्यानूसार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे या उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणासाठी पाठपुरावा सुरू ठेवला. त्यासाठी निधीही मंजूर करून देण्यात आला असून आवश्यक पूर्तता झाल्यानंतर आता एमएमआरडीएने या कामासाठी ३२० कोटी रुपयांची निविदा जाहीर केली आहे.
MUIP अंतर्गत शहाड उड्डाणपूलाच्या चौपदरीकरणाचे काम…
वाहनांची गर्दी आणि वाहतूक कोंडीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी शहाड स्टेशन येथील रेल्वे उड्डाणपूल २+२ असा चारपदरी विकसित करणे गरजेचे आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण ग्रामीण तसेच औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी आणि दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प (MUIP) अंतर्गत शहाड येथील रेल्वे उड्डाणपूलाचे चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या रेल्वे उड्डाणपुलाची एकूण लांबी १ हजार ९० मीटर इतकी आहे. निविदा जाहीर झाल्याने लवकरच या उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे शहाड पुलावरची कोंडी लवकरच फुटणार आहे. त्याबदद्ल नागरिकांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहेत.