Site icon LNN

गुड न्यूज; कल्याण डोंबिवलीत कचरा वर्गीकरण 70% तर प्रक्रियेचे प्रमाण 100 टक्क्यांच्या टप्प्यामध्ये

कल्याण डोंबिवलीतील कचऱ्यावरील प्रक्रियेचे सर्व प्रकल्प कार्यान्वित झाल्याची माहिती

कल्याण डोंबिवली दि.29 एप्रिल :
गेल्या काही वर्षांपासून कचऱ्याच्या समस्येने भेडसावणाऱ्या कल्याण डोंबिवलीकरांसाठी एक चांगली बातमी आहे. केडीएमसी प्रशासनाकडून झालेली परिणामकारक जनजागृती आणि त्याला नागरिकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे कल्याण डोंबिवलीकरांनी गेल्या अवघ्या काही महिन्यांमध्ये अशक्य असणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. काही महिन्यांपूर्वी अवघ्या 5 टक्क्यांवर असणारे कचरा वर्गीकरणाचे प्रमाण तब्बल 70 टक्क्यांपर्यंत पोहोचले असून कचऱ्यावरील प्रक्रियाही आता 100 टक्क्यांच्या टप्प्यामध्ये आल्याची महत्त्वपूर्ण माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे यांनी दिली आहे. (Good News: Waste Segregation Reaches 70% in Kalyan-Dombivli; Processing Nears 100% Mark)

एकीकडे जनजागृती दुसरीकडे प्रकल्प कार्यान्वित करण्यावर भर…
कल्याण डोंबिवलीतील कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी गेल्या वर्षभरात केडीएमसी प्रशासनाने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासह अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. ज्यामध्ये केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत असलेली शाश्वत शून्य कचरा संकल्पना, कचऱ्याची समस्या सोडवण्याच्या क्षेत्रात देशभर नावलौकिक मिळवलेले शासकीय अधिकारी रामदास कोकरे यांचे झालेले कमबॅक आणि कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांची साथ,कर्मचाऱ्यांकडून एक तास वर्गीकरणासाठी,चाळ- सोसायटीमध्ये स्वच्छता कमिटी, वर्गीकरणासाठी प्रभावी जनजागृती, महिला बचत गटातील महिलांची स्वच्छता मार्शल म्हणून नेमणूक यांसह प्रलंबित असणारे कल्याण डोंबिवलीतील वेगवेगळे कचरा प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासारख्या महत्वाच्या निर्णयांचा समावेश आहे.


या प्रमुख कारणांमुळे झाली ही फलश्रुती…
कचरा समस्या सोडवण्यासाठी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी दिलेले निर्देश, ओला – सुका कचरा वर्गीकरणासाठी उपआयुक्त रामदास कोकरे यांनी शिस्तबद्ध सुरू केलेले प्रयत्न, त्याला केडीएमसी कर्मचाऱ्यांची लाभलेली साथ. आणि या सर्व प्रयत्नांना कल्याण डोंबिवलीतील नागरिकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद म्हणजेच कचरा वर्गीकरणाचा वाढलेला हा टक्का. यासोबतच कल्याण डोंबिवलीमध्ये प्रस्तावित असलेले विभागीय कचरा प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी वेगाने उचलण्यात आलेली पाऊले. याची फलश्रुती म्हणजे 70 टक्क्यांहून अधिक कचरा वर्गीकरण आणि सर्वच प्रकल्प पूर्ण झाल्याने कचऱ्यावरील प्रक्रियेचे 100 टक्क्यांपर्यंत पोहोचलेले प्रमाण असल्याची प्रतिक्रिया यासाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या उपआयुक्त रामदास कोकरे यांनी दिली आहे.

कल्याण-डोंबिवली परिसरात शाश्वत आणि शून्य कचरा संकल्पनेबाबत नागरिकांमध्ये पुन्हा जागरूकता निर्माण होत असून महापालिका प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आता सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आहे.

मुळाक्षरे गिरवणाऱ्यांकडून बाराखडी शिकण्याची वेळ…
कोविड काळातही रामदास कोकरे यांनी नागरिकांमध्ये कचरा वर्गीकरणाची सवय रुजवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले होते. मात्र, कालांतराने ही सवय काही प्रमाणात कमी झाली होती. आता पुन्हा “मुळाक्षरे गिरवणाऱ्यांकडून बाराखडी शिकण्याची वेळ” आल्याप्रमाणे नागरिकांना त्यांच्याकडून पुन्हा कचरा व्यवस्थापनाचे मूलभूत धडे नव्याने दिले जात आहेत.

क्षेपणभूमीवरील ताणही लक्षणीयरीत्या घटला…
तर महापालिका प्रशासनाने राबवलेल्या शाश्वत शून्य कचरा मोहिमेमुळे कचरा वर्गीकरणाची सवय पुन्हा नागरिकांच्या अंगवळणी पडू लागली आहे. याचा परिणाम म्हणून सध्या निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे १०० टक्के प्रक्रिया केली जात असून, डंपिंग ग्राउंडवर कचरा साठवण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे क्षेपणभूमीवरील ताणही लक्षणीयरीत्या घटल्याचे आकडवारीवरून दिसून येत आहे.

कचरा वर्गीकरण हे केवळ नियम नसून कर्तव्य…
नागरिकांना पुन्हा योग्य सवयी लावण्यासाठी सुमारे ५ ते ६ महिन्यांचा कालावधी लागला. मात्र आता लोकांचा सहभाग आणि प्रतिसाद दोन्ही वाढत आहेत. “कचरा वर्गीकरण हे केवळ नियम नसून आपले कर्तव्य आहे,” याची जाणीव नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. स्वच्छतेचे बाळकडू विसरता कामा नये, असा संदेशही या मोहिमेतून दिला जात असल्याचे उपआयुक्त रामदास कोकरे यांनी स्पष्ट केले.

आगीसाठी कचरा शिल्लकच राहणार नाही…
दरम्यान, शहरातील सर्व कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित झाले असून बायो-मायनिंग प्रक्रियेलाही वेग आला आहे. प्रशासन आणि कर्मचारी रात्रंदिवस मेहनत घेत असून, येत्या वर्षात कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे लागणाऱ्या आगींचाही प्रश्न पूर्णपणे मिटवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एमएमआर क्षेत्रातील अनेक महापालिका कचऱ्याच्या आगींमुळे त्रस्त असताना, कल्याण-डोंबिवली महापालिकेने पुढील वर्षी आगीसाठी कचरा शिल्लकच राहणार नाही, असे नियोजन करण्यात आल्याचे कोकरे यांनी सांगितले. त्यामुळे कल्याण डोंबिवली शहरं स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल मानले जात आहे.

Exit mobile version