Home ठळक बातम्या दुर्गाडी, पत्रीपुलाचे काम युद्धपातळीवर नव्हे तर कासवापेक्षाही संथगतीने

दुर्गाडी, पत्रीपुलाचे काम युद्धपातळीवर नव्हे तर कासवापेक्षाही संथगतीने

केतन बेटावदकर
कल्याण दि.1 नोव्हेंबर :
कल्याणातील वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असणारे उड्डाणपूल म्हणजे एक नेतीवलीचा तर दुसरा दुर्गाडीचा. या दोन्ही ठिकाणी नविन उड्डाणपूल बांधण्यात येत असून हे दोन्ही पूल युद्धपातळीवर बांधून पूर्ण करू या आश्वासनाचा सरकारला बहुधा विसर पडलेला दिसतोय. कारण या दोन्ही ठिकाणच्या कामांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता युद्धपातळीचे काम तर दूरच साधे कासवगतीचे कामही सुरू नसल्याचे आढळून आले. किंबहुना याठिकाणी सुरू असणाऱ्या कामापेक्षा कासवाचा वेगही कित्येक पटीने अधिक असल्याचे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

आधीच इतर सामाजिक समस्यांनी पिचलेले कल्याण डोंबिवलीकर गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीच्या अक्षरशः नरकयातना भोगत आहेत. त्यावर उपाय म्हणून साधारणपणे अडीच महिन्यांपूर्वी नव्या दुर्गाडी पुलाच्या कामाचे मोठ्या थाटामाटात भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी लवकरात लवकर हा उड्डाणपूल बांधून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएला दिले. त्यामूळे आता लवकरच दुर्गाडी परिसरातील वाहतूक कोंडीच्या त्रासातून आपली सुटका होईल अशी भाबडी आशा लोकांच्या मनात निर्माण झाली. पंरतु गेल्या 30 महिन्यात नविन दुर्गाडी पुलाचे 4 खांब वगळता याठिकाणी काहीच निर्माण झाले नाही. हा नाही म्हणायला काही आठवड्यांपूर्वी एमएमआरडीएने एक पत्र काढून (तेही शिवसेना नेते रवी पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे) पुढील सात महिन्यात हा पूल बांधून पूर्ण करण्याची वलग्ना केली. त्यालाही आता 1 महिना उलटला परंतु इथल्या कामाची परिस्थिती आजही पूर्वी होती तशीच आहे. मग हा सर्व पत्रप्रपंच आणि देखावा कशासाठी? ज्याठिकाणी छत्रपती शिवरायांनी त्याकाळी स्वराज्याचे पहिले आरमार उभारले त्याठिकाणी आज प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात एक साधा पूल बांधला जाऊ नये यापेक्ष दुर्दैव ते काय?

तर दुसरीकडे ऑगस्ट महिन्यात नेतीवली येथील जुना ब्रिटिशकालीन पत्रीपुल धोकादायक असल्याचा अचानक साक्षात्कार झाल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. निश्चितच कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच खबरदारी घेणे ही चांगलीच बाब आहे. मात्र त्यासाठीही अंधेरी येथील पूल पडल्यानंतर जाग का यावी? असो. तर ऑगस्टमध्ये अचानक नेतीवली पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यानंतर झालेला अभूतपूर्व गोंधळ कमी होता की काय त्यात मग मुंब्रा बायपासची भर पडली. आणि आधीच वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या कल्याण डोंबिवलीकरांच्या त्रासावर जणू मीठच चोळलं गेले. ‘घरचं झालं थोडं आणि व्ह्याह्याने धाडलं घोडं’ या म्हणीप्रमाणे कल्याण-डोंबिवलीतील वाहतूक व्यवस्था साफ मोडून पडली. अवघ्या काही मिनिटांच्या प्रवासासाठी तास न तास लागू लागले. शहरातील मुख्य रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्तेही वाहतूक कोंडीने ठप्प पडले. मात्र चार महिन्यांच्या या नरकयातना भोगल्यानंतर मुंब्रा बायपास सुरू झाला आणि काही प्रमाणात नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळाला.

चार महिन्यात मुंब्रा बायपास खुला झाला असला तरी पत्रीपुलाच्या कामाला मात्र आजतागायत काही सुरुवात झालेली नाही. गेल्या महिन्यात कल्याणात एक
कार्यक्रमासाठी आलेल्या ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रीपुल आणि दुर्गाडी पुलाचे काम युद्धपातळीवर करून हे दोन्ही पूल लवकरात लवकर पूर्ण केले जातील असे सांगितले. पण अफसोस…त्यालाही आता 1 महिन्याचा कालावधी लोटला असला तरी ही ‘युद्धपातळी’ नेमकी काय असते याचा अद्याप पत्ता लागलेला नाही.

एवढे सगळे घडत असूनही या दोन्ही पुलांबाबत विद्यमान आमदार आणि खासदारांकडून मात्र कोणत्याच प्रकारचा शासनस्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे अद्याप समोर आलेले नाही. दररोज दोन्ही शहरातील हजारो लोकांना भेडसावणाऱ्या या प्रश्नांबाबत या लोकप्रतिनिधींची कोणतीच जबाबदारी, कोणतेही उत्तरदायित्व नाही का? लोकांना झालेल्या, होत असणाऱ्या प्रचंड मनस्तापाची, वेळेच्या अपव्ययाची, पेट्रोलच्या नासाडीची दखल आणि जबाबदारी कोणी घेणार की नाही? नाही तर शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी एकदाचे जाहीर तरी करून टाकावे की कल्याण डोंबिवलीकरांना आमच्या लेखी काडीचीही किंमत नाही, त्यांचा जन्मच नरकयातना भोगण्यासाठी झालेला आहे. म्हणजे मग सर्वच प्रश्न संपुष्टात येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*