Site icon LNN

कल्याणमध्ये आजपासून’वज्रेश्वरी महोत्सव’;जिल्ह्यातील महिला बचत गटांच्या उत्पादनांचे भव्य प्रदर्शन

कल्याण,दि.10 मार्च :

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या हाताला हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी “वज्रेश्वरी महोत्सव: जिल्हास्तरीय सरस व मिनी सरस” प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग आणि ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ठाणे यांच्या वतीने या भव्य महोत्सवाचे नियोजन करण्यात आले असून, यात ग्रामीण संस्कृती आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ पाहायला मिळणार आहे.

या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्वयंसाहाय्यता समूहातील महिलांनी स्वतः उत्पादित केलेल्या मालाचे भव्य प्रदर्शन आणि विक्री होय. यामध्ये प्रामुख्याने हाताने बनवलेल्या सुंदर हस्तकलेच्या वस्तू, आकर्षक गृहसजावटीचे साहित्य, दर्जेदार कापडी पिशव्या आणि पारंपारिक पादत्राणे यांचा समावेश आहे. खवय्यांसाठी या प्रदर्शनात अस्सल ग्रामीण चवीचे विविध खाद्यपदार्थ आणि घरगुती पद्धतीने बनवलेले मसाले उपलब्ध असणार आहेत.

ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या परिश्रमाला योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हे प्रदर्शन एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. हा महोत्सव कल्याण पश्चिम येथील रामबाग परिसरातील मॅक्सी ग्राऊंड, मधुरिमा स्वीट शॉप व नूतन शाळेजवळ आयोजित करण्यात आला आहे. १० मार्च ते १४ मार्च २०२६ या कालावधीत सकाळी १०:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार असून, या प्रदर्शनासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला आहे.

दर्जेदार उत्पादने, सुंदर हस्तकला आणि ग्रामीण चवीचा हा अनोखा संगम अनुभवण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवाला नक्की भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

Exit mobile version