Site icon LNN

कल्याणात एलिट फुटबॉल अरेना, सिटी पार्क येथे ‘AIFF ब्लू कब्स – लीग ऑफ लिटल चॅम्प्स’ स्पर्धेला सुरुवात

फुटबॉलच्या उज्ज्वल भविष्यासाठी रोवली जात आहेत बिजं

कल्याण दि.17 फेब्रुवारी :
लहान मुलांना फुटबॉलचा परिचय करून देण्याच्या उद्देशाने आयोजित AIFF ब्लू कब्स – लीग ऑफ लिटल चॅम्प्स ही ग्रासरूट्स फुटबॉल स्पर्धा कल्याणच्या योगीधाम येथील एलिट फुटबॉल अरेना, सिटी पार्क येथे उत्साहात पार पडत आहे. एलिट स्पोर्टिंग अकॅडमीच्या वतीने, ठाणे फुटबॉल असोसिएशनच्या सहकार्याने आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. (Grassroots football takes centre stage as AIFF Blue Cubs League kicks off in Kalyan)

ही लीग स्पर्धा ११ जानेवारी २०२६ रोजी सुरू झाली असून ८ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे. ४ ते ११ वर्षे वयोगटातील मुलांसाठी विशेषतः तयार करण्यात आलेल्या या स्पर्धेचा मुख्य उद्देश फुटबॉल स्पर्धेतील सहभाग, फुटबॉल शिकणे आणि खेळाडूंचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे हा आहे. या उपक्रमात आतापर्यंत ३०० हून अधिक लहान खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून संरचित ग्रासरूट्स फुटबॉल कार्यक्रमाबाबत त्यांच्यामध्ये असणारी वाढती उत्सुकता यातून स्पष्ट दिसून येत आहे.

AIFF ब्लू कब्सच्या धोरणानुसार या स्पर्धेतील सामने हे खेळाडूंसाठी पूर्णपणे अनुकूल आणि स्पर्धात्मक दडपणापासून मुक्त वातावरणात घेतले जात आहेत. या स्पर्धेच्या निकालापेक्षा मुलांना खेळाचा आनंद घेता यावा आणि त्यांच्या शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत असल्याचे एलिट फुटबॉल अकादमीकडून सांगण्यात आले.

या स्पर्धेच्या माध्यमातून लहान गटांमध्ये सामने, वयोगटानुसार स्वरूप आणि आकर्षक फुटबॉल उपक्रमांद्वारे मुलांना खेळाची मूलतत्त्वे शिकवली जात आहेत. यामुळे समन्वय, संघभावना, शिस्त आणि आत्मविश्वास यांसारख्या महत्त्वाच्या कौशल्यांचा विकास होत आहे.

तर येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये समारोपाकडे वाटचाल करत असलेली ही लीग ऑफ लिटल चॅम्प्स स्पर्धा ग्रासरूट्सच्या दृष्टिकोनातून फुटबॉलचा उत्सव ठरत असून भारतीय फुटबॉलच्या भविष्यासाठी खऱ्या अर्थाने बीजारोपण होत असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

Exit mobile version