Home ठळक बातम्या उष्णतेची लाट कायम : कल्याण डोंबिवलीमध्ये ४३ डिग्रीपेक्षा अधिक तापमानाची नोंद

उष्णतेची लाट कायम : कल्याण डोंबिवलीमध्ये ४३ डिग्रीपेक्षा अधिक तापमानाची नोंद

कल्याणात ४३.५ तर डोंबिवलीत ४३.३ अंश सेल्सिअस तापमान

कल्याण – डोंबिवली दि. २७ एप्रिल :
कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या शहरांमध्ये सूर्य अक्षरशः आग ओकतोय अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. दर दिवसागणिक तापमान वाढत असून उन्हाच्या झळांचे आता चटक्यांमध्ये रूपांतर झाले आहे. कल्याणात आज तब्बल ४३.५ आणि डोंबिवलीत ४३.३ अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. २०१९ नंतर नोंदवले गेलेलं आजचे हे सर्वाधिक तर गेल्या १० वर्षांतील दुसरे उच्चांकी तापमान असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.

कालचा दिवस वगळता (मंगळवारी कल्याण डोंबिवलीत ३८.८ अंश सेल्सिअस) गेले काही दिवस सतत तापमानाचा पारा चाळीशी ओलांडत आहे. आज तर उन्हाने अक्षरशः कहर केला असून सकाळपासूनच उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली. तर दुपारी १२ नंतर तर अधिकच भयानक परिस्थिती निर्माण होत बाहेर पडणेही मुश्किल होऊन बसले. संध्याकाळ झाल्यावरही वातावरणात या भयंकर उष्णतेची दाहकता जाणवत होती.

गेल्या १० वर्षांतील दुसरे उच्चांकी तापमान – हवामान अभ्यासक अभिजीत मोडक
गेल्याच म्हणजेच मार्च महिन्यातही कल्याण, डोंबिवली आणि आसपासच्या शहरातील तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. त्याचीच पुनरावृत्ती यंदाच्या एप्रिल महिन्यातही जाणवत असल्याची प्रतिक्रिया हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली. २०१९ मध्ये कल्याण आणि डोंबिवलीत आजच्याच दिवशी म्हणजे २७ एप्रिल रोजी ४३ अंशापेक्षा जास्त तापमान नोंदवण्यात आले होते.

आज नोंदवण्यात आलेले तापमान

कल्याण – ४३.५

डोंबिवली – ४३.३

उल्हासनगर – ४३.३

बदलापूर – ४३.१

भिवंडी – ४३.६

ठाणे – ४१.७

नवी मुंबई – ४२.३

पलावा – ४४.५

कर्जत – ४५.८

मागील लेखखवय्यांसाठी पर्वणी ; डोंबिवलीत 29 एप्रिल ते 1 मे दरम्यान मिसळ महोत्सवाचे आयोजन
पुढील लेखवंचित मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे अनुबंधचे काम कौतुकास्पद – अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा