Site icon LNN

उष्णतेचा प्रकोप सुरूच; कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या शहरांमध्ये ४२ अंशांहून अधिक तापमानाची नोंद

अंतर्गत कोकणात उष्णतेची लाट कायम, विदर्भालाही टाकले मागे

मुंबई | १० मे :
अंतर्गत कोकणात उष्णतेची तीव्र लाट कायम असून तापमानाच्या पाऱ्याने विदर्भलाही टाकले मागे टाकले. आज सलग तिसऱ्या दिवशी कोकणातील अनेक शहरांमध्ये तापमान ४० ते ४४ अंशांच्या दरम्यान नोंदवण्यात आले असून वाढती आर्द्रता आणि दुपारनंतर येणाऱ्या समुद्री वाऱ्यांमुळे चाळीशीचा पारा थेट ५५ ते ६० अंश सेल्सिअसच्या तप्त भट्टीप्रमाणे जाणवत असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. तर आजही सलग तिसऱ्या दिवशी कल्याण डोंबिवलीतीचा पारा ४२ अंशांहून अधिक असल्याची नोंद झाली आहे. (Heatwave Continues to Intensify; Temperatures Cross 42°C in Kalyan-Dombivli and Nearby Cities)

कोकणातील सर्वाधिक तापमानाची नोंद सुकसळे येथे ४४.५°C इतकी झाली. त्यानंतर बिरवाडी ४४.४°C, भातसानगर ४४.२°C, कर्जत ४४°C, नेरळ ४३.३°C, अंबरनाथ ४३.२°C, पालवा ४३.१°C, मोर्बे ४३°C, चिपळूण ४२.९°C, मनोर ४२.७°C आणि तळोजा ४२.६°C अशी तापमानाची नोंद झाली.

कल्याण-डोंबिवली परिसरातही उष्णतेचा प्रचंड तडाखा जाणवत असून डोंबिवली ४२.३°C, कल्याण ४२.२°C, बदलापूर ४२.१°C, मुंब्रा ४१.९°C, खारघर ४१.८°C, कळवा ४१.७°C, दिवा ४१.६°C, ऐरोली ४१.५°C, दिघा ४१.४°C आणि पनवेल ४१.२°C तापमानाची नोंद झाली आहे.

तसेच घोडबंदर ४१.१°C, कोपरखैरणे ४०.९°C, ठाणे ४०.८°C, मुलुंड ४०.४°C, नेरुळ ४०.३°C, नवी मुंबई विमानतळ ४०.२°C, बेलापूर ४०.१°C आणि कांजूरमार्ग ४०°C पर्यंत तापमान पोहोचले. त्यामुळे नागरिक अक्षरशः उकाड्याने हैराण झाले आहेत.

दुसरीकडे विदर्भातही उष्णतेची लाट कायम असून अकोला ४३.४°C, वर्धा ४३°C, अमरावती ४२.८°C, बुलढाणा ४१.६°C, ब्रह्मपुरी ४०.८°C, नागपूर ४०.६°C, चंद्रपूर ४०.४°C आणि गडचिरोली ४०°C तापमानाची नोंद झाली आहे.

हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी सोशल मीडियावर केलेल्या विश्लेषणानुसार, अंतर्गत कोकणातील उष्णतेचा पॅटर्न सध्या विदर्भासारखा बनत चालला आहे. मात्र विदर्भात उष्णता कोरडी असताना कोकणात समुद्री आर्द्रतेमुळे परिस्थिती अधिक त्रासदायक ठरत आहे. दुपारनंतर समुद्री वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यानंतर हवेत प्रचंड आर्द्रता निर्माण होते आणि त्यामुळे शरीराला जाणवणारे तापमान आणखी धोकादायक पातळीवर पोहोचते.

विशेष म्हणजे अंतर्गत कोकण पट्ट्यात अधिकृत हवामान निरीक्षण केंद्रांची कमतरता असल्याने या भागातील उष्णतेची खरी तीव्रता अनेकदा अधिकृत नोंदींमध्ये पूर्णपणे दिसून येत नसल्याचेही निरीक्षण समोर आले आहे.

दरम्यान, पुढील काही दिवसांत ही उष्णतेची लाट हळूहळू उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाकडे सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पश्चिमेकडील वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यास कोकणातील तापमान पुन्हा ४० अंशांच्या खाली येण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version