ठाणे | ७ जुलै :
ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून समाधानकारक पाऊस झाला असून नदीपात्रे आणि धरणांतील पाणीसाठ्यातही चांगलीच वाढ होत आहे. आतापर्यंत म्हणजेच आठवड्याभराच्या कालावधीत ठाणे जिल्ह्यात सरासरी ८३८ मिमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक ठाणे तालुक्यात झाला आहे. तर ठाणे जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या बारवी धरण क्षेत्रातही दमदार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा ३५ टक्क्यांवर पोहोचला आहे. (Heavy Rains Bring Relief: Thane Records 838 mm Rainfall in a Week, Barvi Dam Water Storage Climbs to 35%)
अहवालानुसार, ठाणे तालुक्यात सर्वाधिक १९६ मिमी एकूण पर्जन्यमान नोंदविण्यात आले असून त्यानंतर भिवंडीमध्ये ८२७ मिमी, उल्हासनगरमध्ये ७१२ मिमी, अंबरनाथमध्ये ८६९ मिमी, कल्याणमध्ये ६५५ मिमी, मुरबाडमध्ये ८४३ मिमी आणि शहापूरमध्ये ६३७ मिमी एकूण पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील एकूण सरासरी पर्जन्यमान ८३८.६३ मिमी इतके झाले असून, ते वार्षिक सरासरीच्या ३१.०६ टक्के आहे.
उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ मात्र धोका कमी…
सततच्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असली तरी काल रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतल्याने नदी अद्याप इशारा पातळीच्या खाली वाहत आहे. मोहने येथे उल्हास नदीची पातळी ८.८० मीटर, जांभुळपाडा येथे १२.७० मीटर, बदलापूर येथे १५.३० मीटर, तर कल्याणजवळील काळू नदी (टिटवाळा) १०१.७० मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे. शहापूर तालुक्यातील भातसा नदीची पातळी ३३.२० मीटर असून ती देखील इशारा पातळीपेक्षा खाली आहे.
*धरणांमध्ये पाणीसाठा वाढला*
दरम्यान आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. अद्याप ही धरणे भरण्यास बराच वेळ असला तरी पावसाचा जोर असाच राहिला तर तीही लवकरच भरू शकतील.
* बारवी धरण– ३५.८७% जलसाठा
* भातसा धरण– ४२.५४% जलसाठा
* तानसा धरण – ४२.८५% जलसाठा
* मोडकसागर धरण – ५२.२२% जलसाठा
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी आजही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला असून नागरिकांनी नदीकाठ, धबधबे आणि सखल भागात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

