Home ठळक बातम्या “कल्याणातील रस्त्यांची दुर्दशा बघवत नाही; बदल घडवून आणण्याची गरज”- गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड

“कल्याणातील रस्त्यांची दुर्दशा बघवत नाही; बदल घडवून आणण्याची गरज”- गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड

 

कल्याण दि.17 जानेवारी :
कल्याणातील रस्त्यांची झालेली दुर्दशा अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही बघायला मिळणार नाही अशी कडवट टिका राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटनासाठी जितेंद्र आव्हाड कल्याणात आले होते. त्यावेळी शिवसेनेचे स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासमोरच आव्हाड यांनी मित्रपक्ष असणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेला हा घरचा आहेर दिला.

कल्याणातील रस्त्याची दुर्दशा बघवत नसून काहीतरी बदल घडवून आणला पाहिजे. हा बदल घडवून आणण्यासाठी तरुणाईने पुढाकार घ्यावा, कारण इतके वाईट रस्ते महाराष्ट्रत कुठेही नसतील या शब्दात राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. कल्याण डोंबिवली शहरात विविध ठिकाणी काँक्रिट रस्त्याची कामे सुरू असून ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि त्यातून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. तसेच प्रशासनाकडून रस्त्यावरील खड्ड्यांची म्हणावी तशी दखल घेतली जात नसल्याचे सांगत प्रशासकीय कारभारावरही आव्हाड यांनी बोट ठेवले.

केडीएमसीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर मनसे-भाजप या प्रमूख विरोधी पक्षांकडून शिवसेनेवर हल्लाबोल सुरू असतानाच आता राज्याच्या सत्तेमध्ये शिवसेनेसोबत असणाऱ्या राष्ट्रवादीनेही शिवसेनेवर त्यांच्याच बालेकिल्ल्यात टिका केली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा