Home ठळक बातम्या गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांकडून एकीकडे मुख्यमंत्र्यांचे कौतूक तर कल्याण-डोंबिवलीतील खड्ड्यांवरून शिवसेना नेत्यांवर...

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांकडून एकीकडे मुख्यमंत्र्यांचे कौतूक तर कल्याण-डोंबिवलीतील खड्ड्यांवरून शिवसेना नेत्यांवर टिका

 

राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नगरसेवकांची लवकरच ‘घरवापसी’चे संकेत

डोंबिवली दि.6 सप्टेंबर :
जसजशी केडीएमसीच्या सार्वत्रिक निवडणुकीची चर्चा रंगू लागली आहे. तसतसं इथल्या राजकारणातील विविध रंगांची उधळणही पाहायला मिळत आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी डोंबिवलीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भरभरून कौतूक केले. तर याच कार्यक्रमात आव्हाड यांनी कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवरून शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वावर यथेच्छ तोंडसुख घेतल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड डोंबिवलीत आले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर स्तुती सुमने…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात ज्या पद्धतीने चांगलं काम केलं आहे. त्याचीच पोच पावती म्हणून देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. मुख्यमंत्री हे कुटुंबवत्सल असून उद्धव ठाकरे यांच्या कामामुळेच आपण कोरोनाला अटकाव घालू शकलो असे सांगत गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर स्तुती सुमने उधळली.

काय हाल आहेत हो कल्याण डोंबिवलीचे…
आपल्याला टिका करायची नाहीए. मात्र कल्याण डोंबिवलीचे काय काय हाल आहेत? रस्ते कसे? पाणी कसे? यावर कोणीही बोलायचं नाही का ? ‘तेरी भी चूप मेरी भी चूप असं नाही चालणार नसून जनतेला त्रास होत असल्यास आपल्या पक्षाविरोधात भूमिका घ्यावी लागली तरी हरकत नसल्याचे सांगत आपल्या मित्रपक्ष शिवसेनेवर त्यांनी टिका केली. तर कळवा मुंब्रा मतदारसंघात येऊन पहा, याठिकाणी रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही. मात्र त्यालाच लागून असणाऱ्या ठाण्यामध्ये खड्डेमय रस्ते असल्याचे सांगत त्यांनी शिवसेनेचे नाव न घेता अप्रत्यक्ष टिका केली.

आपण गर्दीप्रिय नेते मात्र कोरोनाची 3 री लाट गांभीर्याने घ्या..
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कालच्या मेळाव्याला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. त्याचा आणि तिसऱ्या लाटेचा धागा पकडत आव्हाड म्हणाले की आपण गर्दीप्रिय नेते आहोत. लोकांची गर्दी बघून आपल्यालाही हुरूप येतो मात्र कोरोनाच्या 3 ऱ्या लाटेला गांभिर्याने घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नगरसेवकांची लवकरच घरवापसी…
गेल्या काही वर्षांत राष्ट्रवादी सोडून गेलेले कल्याण डोंबिवलीतील अनेक नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत. ते सर्व अस्वस्थ असून त्यांची पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये परत यायची इच्छा आहे. जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी त्यांचे मनपरिवर्तन केल्यास लवकरच आपले लोकं पुन्हा आपल्याकडे येऊ शकतील असे सांगून जितेंद्र आव्हाड यांनी एकप्रकारे भविष्यातील राजकीय वाऱ्यांची दिशा दाखवून दिली.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रवक्ते महेश तपासे, कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, आनंद परांजपे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा