Home ठळक बातम्या अशी कशी ही स्मार्ट सिटी? केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांचे केडीएमसी प्रशासनाला खडे...

अशी कशी ही स्मार्ट सिटी? केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांचे केडीएमसी प्रशासनाला खडे बोल

केडीएमसी मुख्यालयातील स्मार्ट सिटी सेंटरमधील सादरीकरण पाहताना सुनावले खडे बोल

कल्याण दि. १२ सप्टेंबर :
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत केडीएमसीचा समावेश झाला असला तरी त्याच्या कामाच्या दर्जाबाबत थेट केंद्रीय मंत्र्यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सध्या कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर असणाऱ्या केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनीच रस्त्यांसह स्वच्छतेच्या मुद्द्यावरून थेट केडीएमसी प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत. केडीएमसी मुख्यालयातील स्मार्ट सिटीच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरला त्यांनी भेट दिली.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये केडीएमसीचाही समावेश आहे हे ऐकल्यावर आपल्याला धक्काच बसला. बाहेरून आल्यावर इथल्या रस्त्यांची परिस्थिती बघून असे वाटत नाही की ही स्मार्ट सिटी असल्याचे सांगत त्यांनी केडीएमसी प्रशासनाचे कान उपटले. तसेच ज्या ज्या ठिकाणी स्मार्ट सिटीचे काम झाले त्या त्या ठिकाणी आपल्याला चांगला बदल पाहायला मिळाला. पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच त्यांनी शहर सौंदर्यकरणावरही विशेष लक्ष दिले आहे. समाजातील लोकांच्या सहभागाने स्वच्छता मोहीम राबवत केलेलं काम आणि इथल्या स्मार्ट सिटीच्या कामामध्ये भरपूर मोठा फरक असल्याची टिप्पणी ठाकूर यांनी यावेळी केली. तर आज जेव्हा केडीएमसी स्मार्ट सिटी योजनेमध्ये असल्याबाबत आपल्याला सांगितले ते ऐकून आपण हैराण झाल्याचेही अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
दरम्यान केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्मार्ट सिटी कामाच्या दर्जाबाबत व्यक्त केलेल्या या भावनांमुळे केडीएमसी प्रशासनाची चांगलीच नाचक्की झाल्याचे दिसून आले.

काळा नव्हे भगवा तलाव म्हणा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा संताप…

यावेळी केडीएमसीचे अधिकारी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांची माहिती देत होते. त्यावेळी अधिकाऱ्याने कल्याण पश्चिम येथील काळा तलाव असा उल्लेख केला. आणि तो ऐकून सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी त्यांना थांबवत काळा नव्हे भगवा तलाव म्हणा असे सांगत अशी चूक पुन्हा करू नका आपली रिटायर्डमेंट आल्याचे सुनावले.

तर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या बोलण्याचा धागा पकडत सांगितले की मोदीजी सांगत आहेत की गुलामीच्या विचारांतून बाहेर या, मात्र ते कठीण असल्याचे मत व्यक्त करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

मागील लेखसोशल मिडियावरील भाजप – काँग्रेसचे ड्रेसिंगवॉर आले रस्त्यावर
पुढील लेखसेवा विवेक सामाजिक संस्थेतर्फे आदिवासी महिलांच्या स्वयंरोजगारासाठी बांबू हस्तकलेचे मोफत प्रशिक्षण

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा