Site icon LNN

काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी, केडीएमसी निवडणुकीत 122 जागाही लढवणार – काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर

“काँग्रेस पक्ष सोडून गेलेल्यांना आमच्या शुभेच्छा, मात्र जाण्याने काही फरक पडणार नाही”

आम आदमी पक्षाच्या 50 हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

कल्याण दि.19 डिसेंबर :
आमच्या पक्षामध्ये येण्यासाठी सत्ताधारी पक्षातील इच्छुकांची मोठी गर्दी असून येणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वच्या सर्व 122 जागा लढवण्यासाठी तयारी करत असल्याचा ठाम विश्वास काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष राजा पातकर यांनी व्यक्त केला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँगेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी पक्षाची भूमिका मांडण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Huge Rush of Aspirants to Join Congress; Party to Contest All 122 Seats in KDMC Elections – Congress District President Raja Patkar)

आमच्या काही पदाधिकाऱ्यांना पक्षाने खूप काही दिले, मात्र तरीही ते काही कारणास्तव पक्ष सोडून गेले. त्यांना आमच्या शुभेच्छा असून कोणत्याही कार्यकर्त्यापेक्षा पक्ष हा मोठा असतो. त्यामुळे त्यांच्या जाण्याने काँग्रेसला कोणताही फरक पडणार नाही, त्यांच्या जागी पक्षाने नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्याचे जिल्हाध्यक्ष पातकर यांनी सांगितले. तर आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस सर्वच्या सर्व 31 पॅनलमध्ये निवडणूक लढवणार असल्याचे सुतोवाचही त्यांनी यावेळी केले.

तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर गेल्या 25 वर्षांपासून शिवसेना भाजप युतीची सत्ता असूनही या अडीच दशकांत इथली एकही नागरी समस्या त्यांना सोडवता आलेली नाही. मग ती पाणीप्रश्न असो की आरोग्य सुविधा असो की अस्वच्छता, की वाहतूक कोंडी. या सर्व समस्या अत्यंत बिकट झाल्या असून प्रशासनाचे त्यावर कोणतेही नियंत्रण नसल्याची टीका महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी केली.

तर सत्ताधाऱ्यांनी विरोधक संपवायला घेतलेले आहेत, कल्याण डोंबिवलीमध्ये स्वतःचा पदाधिकारी मिळत नसल्याने सत्ताधारी शिवसेना भाजप हे काँग्रेस राष्ट्रवादीचे पदाधिकारी घेत असल्याचा टोला प्रदेश सरचिटणीस नविन सिंग यांनी लगावला.

आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढून वर्चस्व प्रस्थापित करू…
तर काँग्रेस हा सर्वात जुना पक्ष असून त्याने कित्येक वर्षांत अशी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भरती ओहोटी पाहिली आहे. त्यामुळे आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवून पुन्हा एकदा आमची ताकद प्रस्थापित करू असा विश्वास प्रदेश उपाध्यक्ष आणि केडीएमसी प्रभारी राजन भोसले यांनी यावेळी व्यक्त केला. सध्याच्या घडीला आमचे 122 उमेदवार कसे होतील यासाठी आम्ही प्रयत्नशील असून सत्ताधारी भाजपचेही इच्छुक आमच्या पक्षात रांगेमध्ये उभे असल्याचा गौप्यस्फोटही भोसले यांनी यावेळी केला.

Exit mobile version