Home ठळक बातम्या कळसुबाई शिखरावरील मंदिराचा जीर्णोद्धार न झाल्यास 95 वर्षांच्या आजीबाईंचा आत्महत्येचा इशारा

कळसुबाई शिखरावरील मंदिराचा जीर्णोद्धार न झाल्यास 95 वर्षांच्या आजीबाईंचा आत्महत्येचा इशारा

कल्याण दि.5 जानेवारी :
महाराष्ट्रातील सर्वांत उंच अशी ख्याती असणाऱ्या कळसुबाई गडावरील मंदिराचे पावित्र्य राखले जात नसून या मंदिराचा जीर्णोद्धार न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा 95 वर्षीय आजीबाईंनी दिला आहे. कल्याण जिल्हाप्रमूख गोपाळ लांडगे यांच्या पुढाकाराने कल्याणात झालेल्या पत्रकार परिषदेत 95 वर्षीय हौसाबाई नाईकवाडी यांनी हा इशारा दिला.

कळसुबाई शिखरावरील या मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या ट्रस्टकडे आपण गेल्या 3 वर्षांपासून जीर्णोद्धार करण्याची मागणी करीत आहोत. मात्र मंदिर व्यवस्थापनाने त्याकडे कानाडोळा केला असून आपल्यालाही या मंदिरात येण्यास मज्जाव केल्याचे हौसाबाई यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच या जीर्णोद्धाराबाबत आपण ट्रस्टचे अध्यक्ष आणि स्थानिक आमदार यांचीही भेट घेतली. परंतू त्यांच्याकडूनही या मागणीची अद्याप दखल घेतली गेलेली नाही.

आजच्या घडीला मंदिराचे बांधकाम जुने झाले असून मंदिराला तडे गेले आहेत. तसेच देवीच्या मूर्तीचेही पावित्र्य आणि साफसफाई राखली जात नसल्याचे सांगताना हौसाबाई यांचे डोळे पाणावले होते. जर लवकरात लवकर या मंदिराचा जीर्णोद्धार झाला नाही तर आपण त्याच ठिकाणी आत्महत्या करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

तर शिवसेना संपूर्णपणे हौसाबाई यांच्या पाठीशी असून या मंदिराचे जीर्णोद्धार होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी कल्याण जिल्हाप्रमूख गोपाळ लांडगे यांनी दिले. यावेळी माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे देखील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*