आयएमएसह केम्पा, निमा आदी संघटनाही झाल्या सहभागी
कल्याण | ८ जुलै :
केडीएमसी शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर – नर्सेस मारहाणप्रकरणी आयएमए कल्याणने आपत्कालीन कक्ष वगळता शहरातील सर्व खासगी डॉक्टरांच्या ओपीडी आणि आयपीडी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या मारहाण प्रकरणातील व्यक्तींवर अटकेची कारवाई न झाल्यास कालच कल्याण डोंबिवली आयएमएकडून बंदचा इशारा देण्यात आला होता. त्यानूसार आज कल्याणातील खासगी डॉक्टरांच्या आयएमएसह केम्पा,निमा आदी संघटनांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याची माहिती कल्याण आय एम ए अध्यक्ष डॉ. राजेश राघव राजू यांनी दिली आहे. तर सायंकाळी ५ वाजता डोंबिवलीच्या पाठारे हॉलमध्ये सर्व डॉक्टरांची बैठक होणार असून त्यामध्ये पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. (Doctor Assault Triggers Protest: IMA Shuts Down Private OPD & IPD Services Across Kalyan Seeking Immediate Legal Action)
डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेसना गरोदर महिलेच्या उपचारावरून शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेचे वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही तीव्र पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. या घटनेच्या निषेधार्थ केडीएमसीच्या शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रुग्णालयातील डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कालपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या कल्याण डोंबिवली शाखांनीही पाठिंबा दिला असून केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता.
दरम्यान याप्रकरणी काल रात्री विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र मारहाण करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर अटकेच्या कारवाईच्या मागणीसाठी इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणने आज शहरातील सर्व खासगी ओपीडी आणि आयपीडी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष डॉ. राजेश राघव राजू यांनी दिली आहे. रुग्णालयातील आपत्कालीन कक्ष वगळता डॉक्टरांच्या सर्व सेवा पूर्णपणे बंद राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आज सकाळी ९ वाजल्यापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच सायंकाळी ५ वाजता डोंबिवलीच्या पाठारे हॉलमध्ये सर्व डॉक्टरांची एक बैठक होणार असून त्यामध्ये पुढील आंदोलनाची दिशाही ठरवली जाणार असल्याचे डॉ. राजेश राघव राजू यांनी सांगितले.

